esakal | Solapur : बार्शीत माजी नगरसेविकेचे भरदिवसा घर फोडले! तीन लाखांचा ऐवज लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

बार्शीत माजी नगरसेविकेचे भरदिवसा घर फोडले! तीन लाखांचा ऐवज लंपास

शहरातील अलिपूर रस्त्यावर असणाऱ्या सन्मित्र हाउसिंग सोसायटीमध्ये माजी नगरसेविकेच्या घरात भरदिवसा चोरी झाली.

बार्शीत माजी नगरसेविकेचे भरदिवसा घर फोडले! 3 लाखांचा ऐवज लंपास

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : शहरातील अलिपूर रस्त्यावर असणाऱ्या सन्मित्र हाउसिंग सोसायटीमध्ये माजी नगरसेविकेच्या घराची भरदिवसा कुलूप- कोयंडा तोडून घरातील सोने - चांदीच्या दागिन्यांसह कागदपत्रे असा तीन लाखांचा ऐवज चोरांनी (Theft) लंपास केला आहे. याबाबत बार्शी शहर पोलिसांत (Barshi City Police) गुन्हा दाखल झाला आहे. श्वानपथकासह ठसे तज्ज्ञांनी माहिती घेतली.

हेही वाचा: माढा तालुक्‍यातील भोसरे येथे पाच घरांवर सशस्त्र दरोडा! एक जखमी

माजी नगरसेविका संगीता मेनकुदळे यांचे पती सिद्धेश्वर मेनकुदळे यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी सातच्या दरम्यान घडली. गाडेगाव रस्त्यावर राहणाऱ्या मुलीकडे भेटण्यासाठी सर्वजण कुटुंबासह गेले होते. सायंकाळी सात वाजता परत आल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचा कडी- कोयंडा तोडलेला दिसताच चोरी झाल्याचे उघडकीस आले.

घरातील लोखंडी कपाट व फर्निचरच्या कपाटातील सामान चोरट्यांनी अस्ताव्यस्त केले होते. कपाटातील 15 ग्रॅमचे लॉकेट, 15 ग्रॅमच्या तीन अंगठ्या, पाच ग्रॅमचे झुबे, सहा ग्रॅमची कर्णफुले, तीन ग्रॅमचे मंगळसूत्र, तीन ग्रॅमच्या नथ, चार ग्रॅमचे झुमके, दोन चांदीचे ब्रेसलेट यासह दोन बॅंकांची पासबुके व इतर कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केली आहेत.

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून, ठसे तज्ज्ञ तसेच श्वानपथक मागवण्यात आले होते. श्वानाने घरापासून कुर्डुवाडी रस्त्यापर्यंत माग काढला आणि तेथेच घुटमळले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करीत आहेत.

हेही वाचा: Solapur : मुलगी व पत्नीचा खून! पती, सासू अन्‌ शेजारणीला जन्मठेप

जिल्ह्यातील दरोडे व चोरीच्या घटना पाहता बार्शी तालुक्‍यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी व चोर - दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

loading image
go to top