बार्शीत विवाहितेची डिझेल ओतून घेऊन आत्महत्या! पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बार्शीत विवाहितेची डिझेल ओतून घेऊन आत्महत्या! पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल
बार्शीत विवाहितेची पेटवून घेऊन आत्महत्या! पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

बार्शीत विवाहितेची पेटवून घेऊन आत्महत्या! चौघांविरोधात गुन्हा दाखल

बार्शी (सोलापूर) : कुटुंबाच्या परस्पर तुम्ही आळंदी येथे प्रेमविवाह केलात, माहेरहून तू काहीच आणले नाही, तुला मूल होत नाही, अशा जाचाला कंटाळून नवविवाहितेने राहत्या घरी डिझेल ओतून घेऊन आत्महत्या केली. बार्शी शहर पोलिस ठाण्यात (Barshi City Police Station) पती, सासरा, सासू, दीर अशा चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल झाला असून, तिघांना अटक करून बार्शी न्यायालयात उभे केले असता, न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके यांनी त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पती अविनाश कसबे, सासरा अरुण कसबे, दीर अमर कसबे अशी पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. सासू सविता कसबे हिला अद्याप अटक झाली नसून, विवाहितेची आई राधा ननवरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. सोनियल ऊर्फ संध्या कसबे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना 24 सप्टेंबर 2020 ते 9 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली. उपचार सुरू असताना 11 नोव्हेंबर रोजी सोनियलचा मृत्यू झाला.

हेही वाचा: मारुती चितमपल्ली म्हणाले, हंस हा दूध व पाणी वेगळे करत नाही, तर...

संध्या अन्‌ अविनाश यांनी पळून जाऊन एक वर्षापूर्वी विवाह केला होता. संध्याने मला तसेच तिच्या पुणे येथील बहिणीला विवाहानंतर सासरचे सर्व जण शिवीगाळ, मारहाण, मानसिक छळ, जाचहाट करीत असून तू मला पुण्याला तुझ्याकडे घेऊन जा, असे फोनद्वारे म्हटले होते. नुकत्याच झालेल्या तिच्या विवाहाच्या वाढदिवशीही संध्याला मारहाण करण्यात आली. सासरच्या त्रासाला कंटाळून तिने घरातील डिझेल ओतून घेऊन आत्महत्या केली. येथील खासगी रुग्णालयात उपचार करून उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस निरीक्षक रामदास शेळके हे करीत आहेत.

loading image
go to top