अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली म्हणाले, हंस हा दूध व पाणी वेगळे करत नाही, तर... | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली
अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली म्हणाले, हंस हा दूध व पाणी वेगळे करत नाही, तर...

मारुती चितमपल्ली म्हणाले, हंस हा दूध व पाणी वेगळे करत नाही, तर...

सोलापूर : लाखो किलोमीटर अंतराची जंगल भटकंती... निसर्ग वाचनाच्या रोजच्या नोंदी... पु.ल., गो. नि. दांडेकर, नरहर कुरुंदकर यांच्या सहवासाने माझे लेखन फुलत राहिले. बुधवार पेठेत राहात असताना शिक्षक नागोबा पतंगे व माझ्या आत्याने मला निसर्गाची आवड लावली. नंतर फर्ग्युसन महाविद्यालयात असताना वन अधिकारी पदावर रुजू झालो. तेव्हापासून भटकंती, निरीक्षणे व लेखनाची सवय या गोष्टी निसर्ग वाचनात अविभाज्य झाले, असा जीवनप्रवास अरण्यऋशी डॉ. मारुती चितमपल्ली (Aranyarishi Dr. Maruti Chitampalli) यांनी उलगडला.

येथील शिवदारे फार्मसी कॉलेजच्या सभागृहात डॉ. मेतन फाउंडेशन, वनविभाग, फार्मसी कॉलेज आदी संस्थांच्या वतीने राज्य पक्षी निरीक्षण सप्ताहाच्या निमित्त अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली यांची प्रगट मुलाखत झाली. व्यासपीठावर डॉ. चितमपल्ली यांच्यासह पोलिस आयुक्त हरीश बैजल, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, मेतन फाउंडेशनचे डॉ. व्यंकटेश मेतन, प्राचार्य रविकांत पाटील, राज्य पक्षीमित्र संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. निनाद शहा, मंजूषा गाडगीळ उपस्थित होते.

हेही वाचा: पोषण ट्रॅकरच्या तांत्रिक दोषामुळे कुपोषित मुलांची माहिती चुकीची

डॉ. चितमपल्ली म्हणाले, मी सोलापुरातील बुधवार पेठेत राहात असताना शिक्षक नागोबा पतंगे व माझ्या आत्याने मला निसर्गाची आवड लावली. नंतर फर्ग्युसन महाविद्यालयात असताना वन अधिकारी पदावर रुजू झालो. तेव्हापासून भटकंती, निरीक्षणे व लेखनाची सवय या गोष्टी निसर्ग वाचनात अविभाज्य झाले. प्रख्यात साहित्यिक नरहर कुरुंदकरांच्या मदतीने संस्कृत शिक्षण जिज्ञासेपोटी पूर्ण केले. विदर्भामध्ये लेखक व्यंकटेश माडगूळकर माझ्यासोबत 15 दिवस होते. त्यांनी मला सोपी शब्दरचना, लहान वाक्‍ये, जोडाक्षराशिवाय लेखन आदी लेखनातील गुपिते समजावली.

जंगलातील आदिवासींनी मला वाघासमोर घाबरल्यानंतर त्याला आपल्या शरीरातील हार्मोन्सचा गंध लागल्याने तो आक्रमक होतो, हे समजावून सांगत निर्भय केले. तिबेटियन निर्वासितांनी भीती घालवणारे मेडिटेशन मला शिकवले. मी काही काळानंतर मांसाहार सोडून देत शाकाहारी बनलो, हेच माझ्या प्रकृतीचे रहस्य असावे. नंतर तळेगाव येथे साहित्यिक गो. नि. दांडेकरांचे एकटाकी लेखन समजावून घेतले. नागझरीला असताना अचानक पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, बाबा आमटे यांचा सहवास लाभला. पु. ल. देशपांडे यांच्या शिफारशीने मौज प्रकाशनने माझे लेखन स्वीकारले, अशी माहितीही डॉ. मारुती चितमपल्ली यांनी सांगितले.

डॉ. चितमपल्ली यांच्या मुलाखतीतील मुद्दे

  • चकोर पक्षी चांदणे टिपत नाही तर तो चंद्रप्रकाशात चमचमणाऱ्या वाळवीच्या कीटकांना टिपतो

  • चातक हा पक्षी पावसाचेच पाणी पितो असे नव्हे तर तो केवळ पानावरील पाण्याचे थेंब, दवबिंदू पितो

  • कोकिळ नर पक्षी फक्त गातो मादी नव्हे

  • हंस हा दूध व पाणी वेगळे करत नाही तर कमळाच्या देठाची साल काढून त्यातील दुधाच्या रंगाचा चिक पितो

  • चिमण्या मुळातच हाउस स्पॅरो आहेत, त्या घरातच घरटी बांधतात. घराची बांधकामे वेगळी झाल्याने त्या कमी झाल्या आहेत

  • पिंपळ कुळाची झाडे लावणे हाच निसर्ग संवर्धनाचा उपाय

  • विदेशी झाडे लावणे मुळातच चुकीचे

  • वराह मिहीर यांच्या ग्रंथात वृक्षलागवडीचे अचूक मार्गदर्शन

  • पक्ष्यांना प्रत्येक नैसर्गिक आपत्तीचे ज्ञान उपजतच

  • पुरेशा अन्नासाठी पक्ष्यांचे होते स्थलांतर

हेही वाचा: तरच होईल पंतप्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे स्वच्छ पंढरपूर तीर्थक्षेत्र!

सोलापूरचे माळरान अभयारण्य का नाही?

सोलापूर भागातील ग्रासलॅंड प्रकारचे वनक्षेत्र अत्यंत वेगळे अशा प्रकारचे आहे. ग्रासलॅंडची एवढी मोठी जैवसंपत्ती जपण्यासाठी या माळरानाचे अभयारण्य का झाले नाही, याबद्दल डॉ. चितमपल्ली यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

loading image
go to top