
Solapur Crime : प्रेमाचा असा अंत; एकाच झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडलं प्रेमी युगुल
सोलापूर शहराजवळ कवठे गावच्या परिसरात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव सुरज कुंडलीक चव्हाण (वय २५) असं आहे. तर आत्महत्या केलेली युवती अल्पवयीन आहे. दोघांच्या घरून लग्नास विरोध असल्यामुळे आत्महत्या केल्याचं प्रमुख कारण सांगितलं जातं आहे. संबधित घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. तर मुलगा सुरज चव्हाण हा मोहोळ तालुक्यातील खुणेश्वर या गावातील रहिवासी असून तो चिंचोळी एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करत होता. वर्षभरापूर्वी अल्पवयीन तरूणी मामाच्या गावामध्ये सुट्टीसाठी आली होती. त्यावेळी सूरज चव्हाणसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. याबाबत घरी समजताच मुलीला परत आई-वडिलांकडे पाठवण्यात आलं होतं.
घरातून विरोध असतानाही दोघांमधील प्रेमसंबंध पुढे चालूच राहिले. दोघांनीही घरी लग्नाबाबत चर्चा केली. त्यावेळी अल्पवयीन तरुणीच्या आई-वडिलांनी लग्नाला विरोध केला. तरूणीच्या वडिलांनी आणि काकांनी खुणेश्वरमध्ये जाऊन बैठक घेऊन लग्नासाठी नकार दिला. सुरजची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.
सुरजचा गावात राहण्यासाठी फक्त पत्राच्या शेड आहे. परिणामी तरुणीच्या कुटुंबियांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला होता. परंतु दोघांनीही लग्नासाठी हट्ट धरल्यामुळे तरुणीची समजूत काढत आधी शिक्षण पूर्ण कर, नंतर विचार करु असा सल्ला देण्यात आला होता.
या सर्व घटनानंतर अल्पवयीन तरूणी ही शुक्रवारी सकाळी महाविद्यालयात गेली होती. नेहमीप्रमाणे ती दुपारी घरी येईल अशी अपेक्षा होती. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परत आली नाही. तरूणीच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्याचा प्रयत्न केला मात्र आधी नातेवाईकांकडे शोधा, २४ तासानंतर गुन्हा दाखल करु अशी माहिती पोलिसांनी दिली. अखेर काल (शनिवारी) सकाळी कवठे गावच्या शिवारात या प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.