esakal | वडिलासह दोन कर्ती मुले कोरोनाने हिरावली ! अज्ञानांवर आले प्रपंचाचे ओझे
sakal

बोलून बातमी शोधा

Adsul

एकीकडे बाप-लेक काळाच्या पडद्याआड गेलेले असतानाच दुसरा मुलगा कोरोनाशी दोन हात करून घरी परतला खरा; पण नियतीने इथेही घात केला.

वडिलासह दोन कर्ती मुले कोरोनाने हिरावली ! अज्ञानांवर आले प्रपंचाचे ओझे

sakal_logo
By
सूर्यकांत बनकर

करकंब (सोलापूर) : सांगवी येथील माजी पोलिस पाटील कृष्णात अडसूळ यांचा मुलगा मधुकर अडसूळ यांना प्रथम कोरोनाची (Covid-19) लागण झाली. त्यांना अथक प्रयत्नानंतरही सोलापूर जिल्ह्यातील रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने फलटण येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कृष्णात अडसूळ व त्यांचा दुसरा मुलगा रवींद्र यांनाही कोरोनाची (Corona) लागण झाली. बघता बघता एका महिन्यातच सांगवी (ता. पंढरपूर) येथील अडसूळ कुटुंबातील वडिलांसह दोन मुलांचा कोरोनाने बळी घेतला. घरातील कर्त्या व्यक्तींवरच काळाने घाला घातल्याने अडसूळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (A father and his two sons died of corona at Sangvi)

हेही वाचा: शहरातील "हे' दोन प्रभाग हॉटस्पॉट ! जिल्ह्यात वाढले आज 905 रुग्ण

सांगवी येथील माजी पोलिस पाटील कृष्णात अडसूळ. त्यांचा मुलगा मधुकर अडसूळ यांना प्रथम कोरोनाची लागण झाली. त्यांना अथक प्रयत्नानंतरही सोलापूर जिल्ह्यातील रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने फलटण येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कृष्णात अडसूळ व त्यांचा दुसरा मुलगा रवींद्र यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांना अकलूज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारदरम्यान रवींद्र यांचा 26 एप्रिल रोजी मृत्यू झाला. मात्र ही घटना वडिलांना कळू दिली नसली तरी शेजारीलच बेडवर उपचार घेणारा मुलगा अचानक गायब झाल्याने बेचैन झालेले वडील कृष्णात अडसूळ यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्या धक्‍क्‍यातच त्यांनीही काळाला मिठी मारली.

हेही वाचा: बार्शीत आढळलेला म्युकरमायकोसिस बुरशीच्या दोन प्रजातींचा! तज्ज्ञांचे संशोधन

एकीकडे बाप-लेक काळाच्या पडद्याआड गेलेले असतानाच दुसरा मुलगा कोरोनाशी दोन हात करून घरी परतला खरा; पण नियतीने इथेही घात केला. मधुकर यांना डोळ्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा एक डोळा निकामी झाल्याने तो काढण्यात आला. अशातच त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद न दिल्याने सोमवारी (ता.24) त्यांचीही प्राणज्योत मालवली. वडिलांसह दोन विवाहित मुलांचा एकापाठोपाठ मृत्यू झाल्याने अडसूळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कृष्णात अडसूळ हे थोरला मुलगा मधुकर यांच्या साथीने शेती करत होते. तर दुसरा मुलगा रवींद्र यांनी शेतीबरोबरच कीर्तन सेवेत परिसरात नाव कमावले होते.

अज्ञान मुलांच्या खांद्यावर प्रपंचाचे ओझे

सांगवी येथील अडसूळ कुटुंबाच्या प्रपंचाचा भार मधुकर आणि रवींद्र यांच्यावर होता. परंतु एकाच महिन्यात अडसूळ कुटुंबातील तिघांवर कोरोनाने घाला घातला. कुटुंबातील कर्ती माणसे गेल्याने अडसूळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील सर्व कर्ती माणसे गेली, शिवाय त्यांच्या प्रपंचाचा गाडा सांभाळण्याची जबाबदारी घरातील अज्ञान मुलांवर आली आहे.