esakal | Solapur : विजेच्या धक्‍क्‍याने 14 वर्षीय मुलीचा मृत्यू! निमगाव येथील दुर्दैवी घटना
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या धक्‍क्‍याने 14 वर्षीय मुलीचा मृत्यू! निमगावातील दुर्घटनामगावातील

निमगाव (नेहरूनगर) ता. माळशिरस येथील 14 वर्षीय नंदिनी दीपक ऐवळे हिचा राहत्या घरासमोर विजेच्या प्रवाहाचा तीव्र धक्का बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

विजेच्या धक्‍क्‍याने 14 वर्षीय मुलीचा मृत्यू! निमगावातील दुर्घटना

sakal_logo
By
नितीन मगर

निमगाव (सोलापूर) : निमगाव (नेहरूनगर) ता. माळशिरस (Malshiras Taluka) येथील 14 वर्षीय नंदिनी दीपक ऐवळे हिचा राहत्या घरासमोर विजेच्या प्रवाहाचा तीव्र धक्का बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. नंदिनी ही बुधवारी (ता. 6) दुपारी दीडच्या सुमारास आपल्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये तारेने बांधलेल्या दोरीवर कपडे वाळत घालत होती. या वेळी विजेचा तीव्र धक्का बसल्याने तिला तत्काळ अकलूज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्‍टरांनी नंदिनीस मृत घोषित केले.

हेही वाचा: देगावच्या बंधाऱ्याने घेतला शेतकऱ्याचा बळी! 'पाटबंधारे'चा हलगर्जीपणा

मंगळवारी रात्री उशिरा निमगाव व परिसरात मोठा पाऊस झाला होता. यामुळे मंगळवारी रात्री उशिरा निमगाव परिसरातील वीज गेली होती. परंतु गेलेली ही वीज बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आली. यानंतर हा प्रकार घडला आहे. निमगाव येथे 33/11 केव्हीचे वीज उपकेंद्र असून, या उपकेंद्रास वेळापूर वीज केंद्रातून वीज पुरवठा होतो. परंतु निमगाव वीज उपकेंद्राद्वारे वीज पुरवठा करणाऱ्या वीज रोहित्रात अनेक वेळा बिघाड होतात. बऱ्याच वेळा वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रामध्ये बिघाड होत असल्याने वीज कमी- अधिक दाबाने मिळत असते. याचाच फटका दीपक ऐवळे यांच्या कुटुंबीयांस बसला असल्याचे बोलले जात आहे.

चौदा वर्षीय नंदिनीचा विजेच्या धक्‍क्‍यामुळे मृत्यू झाला. तिच्या निधनाने निमगाव गावावर शोककळा पसरली आहे. सर्व स्तरातून तिच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या मागे आई ,वडील, एक भाऊ व आजी असा परिवार आहे. बुधवारी शवविच्छेदनानंतर नंदिनीच्या पार्थिवावर निमगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

loading image
go to top