esakal | Solapur : देगावच्या बंधाऱ्याने घेतला शेतकऱ्याचा बळी! पाटबंधारे खात्याचा हलगर्जीपणा
sakal

बोलून बातमी शोधा

देगावच्या बंधाऱ्याने घेतला शेतकऱ्याचा बळी!

पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे देगाव (ता. मोहोळ) येथील भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा मातीचा भराव पुराच्या पाण्यात वाहून गेला.

देगावच्या बंधाऱ्याने घेतला शेतकऱ्याचा बळी! 'पाटबंधारे'चा हलगर्जीपणा

sakal_logo
By
रमेश दास

वाळूज (सोलापूर) : पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) हलगर्जीपणामुळे देगाव (ता. मोहोळ) (Mohol Taluka) येथील भोगावती नदीवरील (Bhogavati River) कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा मातीचा भराव पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे बंधाऱ्याच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहातून जनावरांना चारा, पाणी करण्यासाठी पाण्याच्या प्रवाहातून नदी पलीकडील शेताकडे निघालेल्या शेतकऱ्याचा पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला.

विनायक कृष्णात आतकरे (वय 55 वर्ष) असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी व दोन मुले आहेत. ही घटना आज शुक्रवारी (ता. 7) सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. यामुळे या मृत शेतकऱ्याचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. ही घटना गावात समजताच ग्रामस्थांनी नदीवरील बंधाऱ्याकडे धाव घेतली. त्या शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढून तो पोस्टमॉर्टेमसाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उसाचा झाला पत्रा! ऊस गळीत हंगाम लांबणार?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या आठ दिवसांपासून मोहोळ तालुक्‍यासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या दमदार पावसामुळे भोगावती नदीवरील हिंगणी व ढाळेपिंपळगाव येथील मध्यम प्रकल्प व नागझरी नदीवरील जवळगाव प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे भोगावती, नागझरी नद्यांना पूर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीत थोडा उतार लागला आहे. त्यामुळे गेल्या तीन- चार दिवसांपासून नदी पलीकडील शेतातील जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी विनायक कृष्णात आतकरे हे शेतकरी सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान पाण्याच्या प्रवाहाच्या वरील बाजूने पोहत जात असताना पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने प्रवाहात ओढले गेले व वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला. संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम लवकर न झाल्याने शेतकऱ्याला जीव गमवावा लागला आहे. याबाबत "सकाळने' या फुटलेल्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका असल्याबाबत गेल्या आठ दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केलेल्या बातमीत उल्लेख केला होता.

बंधाऱ्याच्या पश्‍चिमेकडील मातीचा भराव यापूर्वी दोन वेळा वाहून गेला आहे. तर सिमेंट कॉंक्रिटची भिंत 2016 च्या पुरात वाहून गेली होती. 2019 साली त्याची दुरुस्ती व कॉंक्रिट भिंत बांधली खरी, मात्र ठेकेदाराने याचे काम निकृष्ट केल्याने या भिंतीला भेगा पडल्या आहेत, तर मातीचा भराव गेल्या पावसाळ्यात चार फूट खचला होता. तो वाहून जाणार असा अंदाजही "सकाळ'ने व्यक्त केला होता. बंधाऱ्यात तात्पुरते पाणी अडविण्यासाठी टाकण्यात आलेला सदरचा मातीचा भराव पुन्हा यावर्षी वाहून गेल्याने नदी आपला प्रवाह बदलून शेजारील शेतातून वाहत आहे. येथे मोठी सांड पडल्याने कमी जागेतून मोठ्या पाण्याचा प्रवाह वाहत आहे. या प्रवाहात सदरील शेतकरी ओढला गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाबाबत आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाबद्दल देगावकरांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

मोहोळ ग्रामीण रुग्णालयात मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची मोहोळचे नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांनी भेट देऊन सदर घटना शासनापर्यंत पोचवून प्रशासनाच्या वतीने जेवढे सहकार्य करता येईल तेवढे करू, असे आश्वासन दिले.

दोन वर्षांपूर्वी याच वाहून गेलेल्या बंधाऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहातून कृष्णा सोपान कांबळे हे वाहत जात असताना बाभळीच्या झाडाला अडकल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना दोरीच्या सहाय्याने वाचवले होते.

हेही वाचा: सोने-चांदीच्या दरात घसरण! सराफा बाजाराला आली झळाळी

देगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती, नवीन मातीच्या भरावाचे काम करणे व कॉंक्रिट भिंत बांधण्यासाठीची निविदा सूचना क्र. 1 ही 9 जून 2021 रोजीच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया चालू आहे.

- एम. टी. जाधवर, कार्यकारी अभियंता, सोलापूर पाटबंधारे विभाग, सोलापूर

या पाच वर्षांच्या काळात बंधारा दोन वेळा फुटला असून, त्याच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट झालेले होते. भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांच्या खाबूगिरी धोरणामुळे बंधाऱ्याचे काम नीट होत नसताना आणि ग्रामस्थांची त्याच्या विरुद्ध तक्रार असतानाही त्याचे कामाचे बिल काढले गेले आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम चांगले झाले असते तर या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला नसता.

- विलास आतकरे, शेतकरी, देगाव (वा.), ता. मोहोळ

संबंधित पाटबंधारे विभागाच्या वेळखाऊ धोरणामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्‍यात आला आहे. त्यामुळेच आमच्या गावच्या शेतकऱ्याचा वाहून जाऊन मृत्यू झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे.

- तेजस आतकरे, देगाव (वा), ता. मोहोळ

loading image
go to top