esakal | अकलूजला दररोज 250 ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज ! पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न

बोलून बातमी शोधा

Oxygen

अकलूजला दररोज 250 ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज ! पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न

sakal_logo
By
शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : अकलूजमधील विविध रुग्णालयांत ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरवर 422 रुग्ण दाखल असून त्यांच्यासाठी दररोज 250 ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज आहे. सध्या ऑक्‍सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून ऑक्‍सिजन पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती प्रांताधिकारी शमा पवार यांनी दिली.

माळशिरस तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी प्रशासकीय, आरोग्य आणि पोलिस अधिकारी यांची बैठक शिवरत्न येथे घेतली. या बैठकीनंतर प्रांताधिकारी शमा पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली. या बैठकीस भाजप नेते धैर्यशील मोहिते- पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरव राजगुरू, तहसीलदार जगदीश निंबाळकर, पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक श्रेणिक गांधी, आयएमए अध्यक्ष संतोष खडतरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: जिल्ह्यात 11 हजार 849 ऍक्‍टिव्ह रुग्ण ! 1468 नव्याने वाढले; 43 जणांचा मृत्यू

प्रांताधिकारी पवार म्हणाल्या, दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाच्या प्रसाराची गती जास्त असल्याने रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या बुधवारी (ता. 21) अखेर 1682 आहे. यातील फक्त 10 टक्केच रुग्ण कोव्हिड केअरमध्ये दाखल असून बाकीचे घरीच विलगीकरणात आहेत. सध्या ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे रेमडेसिव्हीर व ऑक्‍सिजनचाही तुटवडा भासत आहे. रेमडेसिव्हीर उपलब्धतेनुसार प्रत्येक रुग्णालयात पुरविले जात आहे. रुग्णालयांना ऑक्‍सिजन पुरवठा सातारा, बारामती आणि सोलापुरातून होत होता. परंतु, सातारा व बारामती येथून होणारा पुरवठा खंडित झाल्याने अधिकचा तुटवडा होत आहे. सोलापूरहून होणारा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत

रणजितसिंहांनी उपलब्ध केले लिक्विड ऑक्‍सिजन

या बैठकीत सर्व डॉक्‍टरांनी ऑक्‍सिजन तुटवड्याबाबत तक्रार केली. यावर मात करण्यासाठी लिक्विड ऑक्‍सिजनची गरज असल्याचे सांगताच आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी उपविभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी संपर्क साधला व तत्काळ लिक्विड ऑक्‍सिजन देण्याची विनंती केली. त्यांनीही विनंती मान्य करत ताबडतोब टॅंकर देण्याचे मान्य केले.