esakal | झोका खेळताना बसला फास ! अक्कलकोटमध्ये सातवर्षीय चिमुरडीचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Zoka
झोका खेळताना बसला फास ! अक्कलकोटमध्ये सातवर्षीय चिमुरडीचा मृत्यू
sakal_logo
By
चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : घरातील बेडरूममध्ये खेळण्यासाठी बांधलेल्या साडीच्या झोक्‍यावर झोका खेळत असताना गळफास लागून सात वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखद घटनेची नोंद उत्तर पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून झाली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की या घटनेची खबर मुलीचे वडील डॉ. शिवपुत्र काशीराम गुरव (वय 36, रा. समर्थ विहार, मैंदर्गी रोड, अक्कलकोट) यांनी दिली. मृत सात वर्षीय मुलीचे नाव अभिलाषा शिवपुत्र गुरव असे आहे. मुलीचे वडील व आई हे रविवारी सकाळी नऊ वाजता कामानिमित्त गावात गेले होते व मुलगा निरंजन व मुलगी अभिलाषा हे दोघे घरी खेळत होते.

मुलीचे आई - वडील बाहेरून पावणेदहाच्या सुमारास घरी आल्यावर घरातील बेडरूमचा दरवाजा बंद दिसल्याने पत्नी दरवाजा उघडण्याकरिता गेली असता दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दोन्ही मुलांना हाक मारत ते बाहेर येऊन खिडकीतून पाहिले असता मुलगी अभिलाषा ही बेडरूममध्ये साडीने बांधलेल्या झोक्‍याला लटकलेली दिसली. त्या वेळेस आई - वडिलांनी घरातील पारीने बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून पाहिले असता मुलगी अभिलाषा ही साडीने बांधलेल्या झोक्‍यावर झोका खेळत असताना गळफास लागून बेशुद्ध अवस्थेत दिसली. तिला लगेच अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता घेऊन गेले असता तेथील डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच अभिलाषाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र राठोड हे करीत आहेत.