Pandharpur Accident : भरधाव कार थेट दुकानात घुसली; आजीसह ५ वर्षांच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur Accident

Pandharpur Accident : भरधाव कार थेट दुकानात घुसली; आजीसह ५ वर्षांच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू

पंढरपूर आटपाडी रोडवर शेरेवाडी येथे एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्सची वाट पाहत असणाऱ्या कुटुंबाला उडवून गाडी दुकानात घुसल्याने आज्जी आणि पाच वर्षाच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सांगोला तालुक्यातील शेरेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली असून गाडीच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास हे भरधाव वेगाने गाडी थेट काळेल कुटुंब ज्याठिकाणी उभे होते त्यांच्या अंगावरून शेजारी असणाऱ्या दुकानात घुसली.

या भीषण अपघातात द्रौपदा शिवाजी आटपाडकर आणि सिद्धेश्वर काळेल, अशी मृत आजी-नातवाची नावे आहेत. या भीषण अपघातात मुलाचे वडील नामदेव काळेल आणि त्याची आई रुक्मिणी काळेल देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काळेल कुटुंब कामासाठी मुंबईकडे जात होते. ते पंढरपूर-आटपाडी रोडवरील शेरेवाडीजवळ रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हलसची वाट पाहत उभे होते. यावेळी समोरून एक भरधाव कार आली. या कारने काळेल कुटुंबीयांना जोरदार धडक दिली आणि गाडी दुकानाच्या भिंतीत शिरली.

हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव कार थेट दुकानात शिरली. त्यामुळे दुकानाची भिंत कोसळली. या भीषण अपघातात द्रौपदा शिवाजी आटपाडकर यांचा गाडीखाली येऊन जागीच मृत्यू झाला. तर नातू सिद्धेश्वर काळेल याच्या अंगावर दुकानाची भिंत पडल्यामुळे त्याचाही मृत्यु झाला.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अपघातग्रस्त कार ही एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.