PM-Kisan Scheme : ‘पीएम किसान’साठी करा अचूक अर्ज

दरवर्षी सहा हजार रुपये; रेशनकार्ड बंधनकारक; फेब्रुवारी २०१९ पूर्वी नावावर असावी जमीन
Accurate application PM-Kisan Scheme Six thousand rupees annum Ration Card land should before February 2019
Accurate application PM-Kisan Scheme Six thousand rupees annum Ration Card land should before February 2019Esakal

सोलापूर : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो. त्यासाठी तहसील कार्यालयातून अर्ज करणे खूप सोयीचे असून जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी व राज्यात कृषी आयुक्तांकडून मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ योजनेचा लाभ सुरु होतो.

राज्यातील एक कोटींहून अधिक शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजारांप्रमाणे सहा हजार रुपये ‘पीएम किसान सन्मान’ योजनेतून मिळतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी जमीन नावावर असणे आवश्यक आहे. त्यानंतर जमिनी घेतलेल्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

दरम्यान, अनेकांना सन्मान निधी योजनेची माहिती नव्हती. त्यामुळे अनेकांनी विलंबाने अर्ज केले, अजूनही काहीजण अर्ज करीत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) किंवा स्वत:च्या मोबाईलवरून अर्ज केले आहेत. परंतु, त्याठिकाणी अर्ज केल्यानंतर लाभासाठी खूपच वाट पाहावी लागते.

स्वत:च्या मोबाईलवर किंवा ‘सीएससी’ केंद्रातून अर्ज केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या अर्जाची पडताळणी तलाठ्यांकडून होते आणि त्यानंतर तो अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जातो. मात्र, तहसील कार्यालयातून अर्ज केल्यास तहसीलदारांमार्फत तो अर्ज काही दिवसांत जिल्हास्तरावर पाठवला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयातूनच अर्ज करणे सोयीचे ठरत आहे.

योजनेचा लाभ ‘असा’ घेता येईल

१ फेब्रुवारी २०१९ पूर्वी जमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांनी सात-बारा, आठ-अ आणि रेशनकार्ड, आधारकार्ड, बॅंक पासबूक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा तहसील कार्यालयात योजनेचे काम पाहणाऱ्यांकडे नेऊन द्यावे. तेथे ‘पीएम किसान’ ॲपवर त्या शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते. तहसील, जिल्हा व राज्य स्तरावर त्या अर्जाला मान्यता मिळाली की त्याच दिवसापासून संबंधित शेतकऱ्याला योजनेचा लाभ सुरु होतो.

अडीच लाख शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत

राज्यातील दोन लाख ३९ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सन्मान योजनेसाठी अर्ज करूनही लाभ मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे योजनेचे सन्वयक संजय हिवाळे यांनी सांगितले. दरम्यान, सव्वालाख अर्ज हे तालुकास्तरावरच तहसीलदारांच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा व राज्य स्तरावर देखील तेवढेच अर्ज प्रलंबित आहेत. अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने तेवढे शेतकरी वर्षभरापासून योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

बँक खात्याला आधार प्रमाणीकरण आवश्‍यक

सन्मान निधी योजनेतर्गंत हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींच्या बँक खात्याला आधार क्रमांकास जोडणे आवश्यक आहे. राज्यात सद्यस्थितीत १४ लाख ३२ हजार लाभार्थींनी बँक खाते त्यांच्या आधार क्रमांकाला जोडलेले नाही. त्यामुळे त्यांना १३ व्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. त्या शेतकऱ्यांच्या याद्या गावनिहाय उपलब्ध करून दिल्या आहेत.

लाभार्थीना बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा १ ते १२ फेब्रुवारीपर्यंत गावातील टपाल कार्यालयात उपलब्ध असणार आहे. आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, या कागदपत्रांच्या आधारे इंडीया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) टपाल कर्मचाऱ्यांमार्फत खाते उघडावे. बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल. सर्व प्रलंबित लाभार्थीनी बँक खाते उघडून घ्यावे, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com