esakal | सोलापुरात प्रशासन पॉझिटिव्ह, कोरोना निगेटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

Administration positive and Corona Negative in Solapur

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील महापालिका, आरोग्य, जिल्हा परिषद, पोलिस, कृषी यासह अत्यावश्‍यक सेवेतील सर्वच विभाग प्रभावीपणे कामकाज करू लागले आहेत. निजामुद्दीन येथील मरकजला गेलेल्यांचा शोध असो की सोलापूर जिल्ह्यातून ग्वाल्हेरला गेलेल्या बेदाणा शेड येथील कामगाराचा शोध असो.

सोलापुरात प्रशासन पॉझिटिव्ह, कोरोना निगेटिव्ह 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग संपूर्ण जगभर सुरू आहे. महाराष्ट्रातील सोलापूर आणि परभणी जिल्हे वगळता बहुतांश जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. सोलापूरच्या सीमेवर असलेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांतही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सोलापूर जिल्ह्यात मात्र अद्याप कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. लॉकडाउन, संचारबंदी, जमावबंदी या आदेशांसह सोलापूरच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी कोरोना रोखण्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका घेतल्याने सोलापूर जिल्ह्यात कोरोना निगेटिव्ह झाला आहे. 
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील महापालिका, आरोग्य, जिल्हा परिषद, पोलिस, कृषी यासह अत्यावश्‍यक सेवेतील सर्वच विभाग प्रभावीपणे कामकाज करू लागले आहेत. निजामुद्दीन येथील मरकजला गेलेल्यांचा शोध असो की सोलापूर जिल्ह्यातून ग्वाल्हेरला गेलेल्या बेदाणा शेड येथील कामगाराचा शोध असो. या दोन्ही महत्त्वाच्या घटनांत जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर श्री. शंभरकर यांच्या प्रशासकीय कौशल्याची मोठी परीक्षाच कोरोनानिमित्त झाली आहे. कोरोनामुक्त सोलापूर जिल्हा ठेवण्यात जिल्हाधिकारी शंभरकर व त्यांचे सर्व सहकारी यशस्वी झाले आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी आजपर्यंत सहकार्य केले आहे. या पुढील काळातही शासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन जिल्ह्यातील नागरिकांनी केल्यास कोरोनामुक्त सोलापूर जिल्हा राहील आणि कोरोनाविरुद्धची लढाई आपण निश्‍चित जिंकू, असा विश्‍वास जिल्हाधिकारी शंभरकर यांनी व्यक्त केला आहे. 

हेही वाचा : लॉकडाउन : सांगोल्यात 43 जणांवर गुन्हा दाखल
झेडपी सीईओंवर आयसोलेशन, क्वारंटाइनची जबाबदारी 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याकडे जिल्ह्यातील सर्वच संशयित अशा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची देखरेख व त्यांची संपूर्ण चौकशी करण्याची जबाबदारी दिली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ती जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यात आयसोलेशन, क्वारंटाइन असलेल्यांची स्थिती नेमकी कशी आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत हे संबंधित व्यक्तींशी प्रत्यक्षात फोनद्वारे बोलून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी व शासनाला द्यायचा आहे. सकाळी व संध्याकाळी त्या व्यक्तीला बोलणे आवश्‍यक आहे. त्यासाठी श्री. वायचळ यांनी आपल्या अधिनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या नेमून दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात त्यासाठी नियंत्रण कक्ष तयार केला आहे. या कक्षातील कामकाज कशापद्धतीने करायचे त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांना दिवस ठरवून दिला आहे. तीन शिफ्टमध्ये हे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या संकटकाळात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर दिलेली जबाबदारी ते आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अतिशय सक्षमपणे पार पाडत आहेत. याशिवाय प्रत्येक गावात असलेल्या ग्रामसेवक, आरोग्यसेवकांच्या कामगिरीकडे त्यांचे लक्ष आहे. त्यांनाही योग्य त्या सूचना देण्याचे काम श्री. वायचळ हे करत आहेत. 

महापालिका आयुक्तांनी दिला बेघरांना निवारा 
कोरोना विषाणू पार्श्‍वभूमीवर शहरातील 274 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेच्या 10 निवारा केंद्रांत विविध राज्यांतील 817 नागरिकांची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. श्री. तावरे म्हणाले, ""कोरोना विरोधी लढाईत महापालिकेने सक्रिय सहभाग नोंदवला आहे. महापालिकेकडे शासनाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात महापालिकेस यश आले आहे. शहरात 274 पेक्षा जास्त जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांची माहिती गोळा करणे, त्यांच्यावर 14 दिवस उपचार करणे याकरिता रोज तीन वैद्यकीय अधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत. संसर्ग वाढू नये यासाठी शहराच्या विविध भागांत हात धुण्यासाठी पाण्याची टाकी उभारली असून मास्कचे वाटप सुरू आहे. संचारबंदी व लॉकडाउनने मूळगावी जाता आले नाही अशांना शहरात विविध 10 ठिकाणच्या निवारा केंद्रांत ठेवले आहे. त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन टॉवेल, मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे. खासगी डॉक्‍टरांच्या मदतीने सुरू केलेल्या नागरी आरोग्य केंद्रांतून रोज 250 ते 300 जणांची तपासणी होत आहे. शहरातील 18 मंडईतून दोन हजार 325 विक्रेत्यांना प्रत्येकी दोन मास्कचे वाटप करण्यात आले. उर्वरित विक्रेत्यांना दोन दिवसांत मास्क दिले जाणार आहेत.'' 

हेही वाचा : अबब ! सोलापुरात 14 हजार गुन्हे अन्‌ सव्वासहा हजार वाहने जप्त
पोलिस आयुक्तांनी केली नाकाबंदी
 
सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर सर्वच जिल्ह्यांत कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिस आयुक्‍तालयांच्या वेळोवेळच्या निर्णयाने आणि पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून सोलापूर जिल्हा अद्याप कोरोनापासून चार हात लांबच असल्याचे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी स्पष्ट केले. सोलापूकरांनी मोलाची साथ देत लॉकडाउनचे स्वागत करत घरात बसणे पसंत केले आहे. विनाकारण घराबाहेर जाऊन सामाजिक हिताला धोका पोचविणाऱ्यांवर पोलिस कारवाई केली जात आहे. त्यासाठी सुमारे 600हून अधिक पोलिस कर्मचारी तर एक हजारांपर्यंत होमगार्डची नियुक्‍ती करण्यात आली आहे. राखीव पोलिस दलाचे कर्मचारी अन्‌ पोलिस अधिकाऱ्यांची मदत घेतल्याचे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी सांगितले. शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत 21 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून सीमावर्ती भागात आठ ठिकाणी पोलिस बंदोबस्त असल्याचे ते म्हणाले. 

पोलिस अधीक्षकांनी ग्रामीण भागातही यशस्वी केला लॉकडाउन 
कोरोना विषाणूचा शिरकाव सोलापुरात होऊ नये, यासाठी नागरिकांचा मोठा रोल असल्याने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सुरवातीला गावोगावी प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर रुट मार्च काढण्यात आल्याने नागरिकांनी लॉकडाउनचे पालन करण्यास सुरवात केली. नागरिकांचा प्रतिसाद अन्‌ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची कारवाई, यातून कोरोनापासून जिल्हा दूरच असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. 23 मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार 800 वाहने जप्त केली असून 559 गुन्हे दाखल केले आहेत. संचारबंदी अन्‌ लॉकडाउन असताना विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या एक हजार 800 जणांविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अन्य जिल्ह्यांतून तथा राज्यांतून विनाकारण कोणीही येणार नाही, याची दक्षता पोलिसांमार्फत घेतली जात आहे. त्यासाठी 47 ठिकाणी नाकाबंदी असून 14 ठिकाणी जिल्हाबंदीचा बंदोबस्त लावला आहे. एकूण एक हजार 350 पोलिस कर्मचारी आणि 90 अधिकाऱ्यांची नियुक्‍त केल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. 

आरोग्य विभागाने दाखविली तत्परता 
सोलापूर शहर- जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह सर्व शासकीय रुग्णालयांतील 500हून अधिक डॉक्‍टर्स तर तीन हजारांहून अधिक कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. नागरिकांनी घेतलेली खबरदारी अन्‌ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वॉच, यामुळे कोरोनापासून जिल्हा दूर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले. संपूर्ण शहर- जिल्ह्यात ठिकठिकाणी संशयित नागरिकांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, आता सर्दी, खोकला, ताप असलेल्यांसाठी सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता विभाग तयार केला जाणार आहे. लक्षणे नाही; परंतु निगराणीत ठेवण्याकरिता शहरात तीन ठिकाणे निश्‍चित केली जाणार आहेत. दरम्यान, कोरोना नसूनही निगराणीत ठेवण्याची गरज असणाऱ्यांसाठी तालुकानिहाय व्यवस्था केली जाईल. तसेच मोठ गावांत त्यांची व्यवस्था असेल. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस नियोजन केल्याचेही डॉ. ढेले म्हणाले. 

loading image