खादी वर्दीची ओसरली गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Administrative work begins solapur Municipal Corporation

खादी वर्दीची ओसरली गर्दी

सोलापूर : महापालिकेतील खादी वर्दीची गर्दी ओसरताच आयुक्तांच्या प्रशासकीय कामांचा धडाका सुरू झाला आहे. अतिक्रमण, गुंठेवारी मोजणी, महापालिका दवाखाने आदी विषय हाताळत आयुक्त आता शहरात फिरू लागले आहेत.महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेऊन दोन वर्षे लोटली. या कालावधीत अतिअडचणीचे प्रसंग वगळता ऑफिस सोडून आयुक्त शहरात कधीच फिरकले नाहीत. नागरिक समस्या असो की लोकप्रतिनिधींची समस्या ई-फाईलींद्वारेच ऑफिसमधून कामाचा निपटारा करण्याचे काम त्यांनी आजपर्यंत केले.

शहर विकासाच्यादृष्टीने आयुक्तांनी घेतलेले अनेक निर्णय राजकीय वादापोटी लटकून राहिले. अतिक्रमण, करवसुली, करवाढ, टॅंकरबंद, गुंठेवारी मोजणी, रस्ता अतिक्रमण हटविणे, गाळ्यांची भाडेवाढ, अनधिकृत बांधकामावरील कारवाई अशा अनेक विषय आयुक्तांनी हाताळण्याचे प्रयत्न केले. मात्र निवडणुकीच्या तोंडावर या सर्व गोष्टींना राजकीय विरोध कायम राहिला. त्यामुळे इच्छा असतानाही प्रशासनाचे हात बांधले गेले होते. तीन दिवसांपूर्वी महापालिका सदस्यांचा कार्यकाळ संपला आणि संपूर्ण कारभार प्रशासकाच्या हाती आले. प्रशासक म्हणून आयुक्त पी. शिवशंकर यांचीच नियुक्ती झाली. पहिल्याच दिवशी रोअर मशिनद्वारे गुंठेवारी क्षेत्राची मोजणी सुरू केली. त्यापाठोपाठ अंत्योदय योजनेतील ६१ बचत गटांना कर्ज दिले. बागेसाठी आरक्षित महापालिकेच्या जागेवर झालेले अतिकमण हटवून या ठिकाणी वॉलकंपाउंड बांधण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर विडी घरकूल येथील महापालिकेच्या दवाखान्याची पाहणी करून आवश्‍यक सोयी-सुविधांबाबतचा अहवाल देण्याबाबतचे आदेश दिले. मोठ्या थकबाकदारांची करवसुलीही सक्तीने करण्यात येणार आहे.

विद्यमान नगरसेवक आता माती नगरसेवक झाले आहेत. यामुळे त्यांचे महापालिकेत येणेजाणेही अभावानेच झाले आहे. महापालिकेतील खादी वर्दीची गर्दी ओसरल्याने आणि प्रशासक म्हणून काम करताना आयुक्त स्वत: व इतर अधिकारी शहरात फिरू लागल्याने महापालिकेत शुकशुकाट जाणवू लागला आहे.

प्रशासक म्हणून वेगळी काही जबाबदारी नाही. शहरातील विविध समस्यांसाठी सोडविणयाचे काम पूर्वीपासून सुरूच होते. आता फक्त महापालिका सभेसाठी विषय पाठविणे, त्याची मंजूरी घेणे, मंजुरी येइपर्यंत वाट पाहणे हा वेळ वाचेल.

- पी. शिवशंकर, आयुक्त महापालिका

Web Title: Administrative Work Begins Solapur Municipal Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..