esakal | "सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय' ! कोरोनावर मात करून 453 पोलिस पुन्हा ड्यूटीवर; दहाजणांनी गमावला जीव

बोलून बातमी शोधा

Police

शहर-जिल्ह्यात कोरोना वाढू नये, समाजातील प्रत्येक घटक कोरोनापासून सुरक्षित राहावा, या हेतूने पोलिसांनी मागील वर्षभर रस्त्यांवर रात्रंदिवस खडा पहारा दिला. या काळात शहरातील 138 पोलिस तर ग्रामीणमधील 339 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. 

"सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय' ! कोरोनावर मात करून 453 पोलिस पुन्हा ड्यूटीवर; दहाजणांनी गमावला जीव
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहर-जिल्ह्यात कोरोना वाढू नये, समाजातील प्रत्येक घटक कोरोनापासून सुरक्षित राहावा, या हेतूने पोलिसांनी मागील वर्षभर रस्त्यांवर रात्रंदिवस खडा पहारा दिला. या काळात शहरातील 138 पोलिस तर ग्रामीणमधील 339 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. तरीही त्यांनी "सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदाला जागून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 

पोलिस आणि गुन्हेगारांचे नेहमीचेच नाते साप-मुंगसासारखे राहिले आहे. मात्र, कोरोनाच्या काळात गुन्हेगारांसह त्यांचे कुटुंब, सर्वसामान्यांपासून ते मोठ्या श्रीमंत नागरिकांचे कुटुंब सुरक्षित राहावे, त्यांचे आरोग्य सदृढ राहावे म्हणून पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्‍यात घालून रस्त्यांवर रात्रंदिवस बंदोबस्ताची ड्यूटी केली. अनेकांच्या कुटुंबात ज्येष्ठ आई-वडील, चिमुकली असतानाही त्यांनी त्यांची पर्वा केली नाही. पोलिसांचे कौतुकास्पद काम पाहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोना ड्यूटी करताना मृत्यू झालेल्या पोलिसांना प्रत्येकी 50 लाखांची मदत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. दुसरीकडे, पोलिसांच्या घरांसंदर्भात केलेली घोषणा मात्र, प्रत्यक्षात उतरू शकली नाही. 

राज्यभरात आतापर्यंत एक हजाराहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. दुसरीकडे, सहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात करीत पुन्हा ड्यूटी जॉईन केली आहे. राज्यातील जनता सुरक्षित राहावी, शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून एरव्ही झटणारे तेच हात कोरोना काळात लोकांच्या सुरक्षिततेसाठी पुढे आल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी बेशिस्तांना शिस्त लावण्याचे काम केल्याने अनेकजण कोरोनापासून सुरक्षित राहिल्याचेही दिसून आले. 

पोलिसांची स्थिती 

  • शहर पोलिस पॉझिटिव्ह : 138 
  • कोरोनामुळे मृत्यू : 5 
  • ग्रामीण पोलिस पॉझिटिव्ह : 339 
  • मृत्यू : 5 

पोलिसांच्या योगदानाला नागरिकांचे सहकार्य 
शहर पोलिस दलातील 14 पोलिस कर्मचारी सद्य:स्थितीत कोरोनाबाधित आहेत. त्यातील चारजण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, उर्वरित कर्मचारी होम आयसोलेशनमध्ये आहेत. लोकांची सेवा करताना अनेकांना कोरोनाची बाधा झाली. पोलिसांच्या योगदानामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यातून शहरातील कोरोना वाढला नाही. यापुढील काळातही नागरिकांकडून अशीच सहकार्याची अपेक्षा आहे. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्‍त, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल