
सोलापुर जिल्हा परिषदेने सन 2021मधे स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबविला होता.
'अखेर ठरल! उपमुख्यमंत्री अजित पवार पापरी शाळेला देणार भेट'
मोहोळ - अखेर ठरलं! राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे शनिवारी पापरी शाळेला (Papari School) भेट (Visit) देणार असल्याचे खात्रीलायक समजताच पूर्वतयारी म्हणून, आमदार यशवंत माने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे आदींनी शाळेला भेट देऊन सर्व पाहणी करून मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांना सूचना दिल्या.
सोलापुर जिल्हा परिषदेने सन 2021मधे स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमात इतर शाळा प्रमाणे जिल्हा परिषदेच्या पापरी शाळेनेही आपला सहभाग नोंदविला होता. पुरस्कारा साठी अनेक अटी घातल्या होत्या. त्यांची पुर्तता करून शाळेने 100 पैकी 100 गुण मिळवून आपले वेगळेपण सिद्ध केले. याची दखल घेत शाळेला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार वितरण आठ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. पुरस्कार मुख्याध्यापक श्रीकांत खताळ यांनी स्वीकारला. पुरस्कार वितरणा वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पापरी शाळेला नक्की भेट देईन, असे आश्वासन मुख्याध्यापकांना दिले होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार हे शनिवारी मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे खात्रीलायक समजताच ग्रामस्थ व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीने संबंधिताशी संपर्क करून दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्यामुळे शाळेला भेट देण्याचे नक्की ठरले. पूर्वतयारी म्हणून आमदार यशवंत माने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपाध्यक्ष रामदास चवरे यांनी भेट देऊन पाहणी केली. आपल्या शाळेत उपमूख्यमंत्री येणार असल्याची खात्री होताच त्यांच्या स्वागताची जणू काही घरात विवाह सोहळा असल्यासारखी सर्वांची पळापळी सुरु झाल्याचे चित्र दिसले. यावेळी सौदागर खडके, सतीश भोसले, बाळासाहेब टेकळे, राजेंद्र टेकळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके,गणेश भोसले, सज्जन टेकळे, पद्माकर भोसले आदी सह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.