अजितदादांची व्यूहरचना कोणाला समजेना ! दोन दिवसांच्या मुक्कामात विरोधी गटातील "प्यादे' लागले गळाला?

Pawar_Power
Pawar_Power

पंढरपूर (सोलापूर) : एरव्ही एखाद्या ठिकाणची प्रचार सभा उरकून अजित पवार लगेच पुढे रवाना होत असतात. परंतु, या वेळी पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना विजयी करण्यासाठी त्यांनी वेगळीच फिल्डिंग लावली आहे. अजित पवारांनी केवळ सभा घेऊन न जाता पंढरपूर आणि मंगळवेढ्यात अनेक राजकीय मंडळींच्या घरी भेटी देण्याचा धडाका लावला आहे. याशिवाय परिचारक, मोहिते- पाटील समर्थक कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याने बोलून त्यांना राष्ट्रवादीकडे वळवू लागले आहेत. दादांच्या या भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आता समाधान आवताडे यांच्यासाठी अधिकच धावपळ करावी लागणार आहे. 

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही आणि कायमचा शत्रूही नाही, असे म्हटले जाते. राजकीय मंडळी विरोधकांना वेगवेगळ्या पद्धतीने शह देत असतात. 
राज्यातील राजकीय वातावरण सध्या आरोप- प्रत्यारोपांमुळे ढवळून निघाले आहे. अशा काळात पंढरपूर- मंगळवेढ्याची पोटनिवडणूक होणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. या निवडणुकीत पराभव झाला तर राज्यभर वेगळा संदेश जाईल, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच, या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. 

गेल्या काही वर्षांपासून विरोधक असलेले मोहिते- पाटील आणि परिचारक भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीतील भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांना विजयी करण्यासाठी चंग बांधला आहे. समाधान आवताडे यांचा मंगळवेढा भागात मोठा जनसंपर्क आहे. त्यातच त्यांना मोहिते- पाटील आणि परिचारकांची साथ मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे. गावागावांत आवताडे यांना मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. 

दरम्यान, एरव्ही प्रचार सभा करून पुढे रवाना होणाऱ्या अजित पवारांनी मतदारसंघात भाजपने निर्माण केलेली ताकद लक्षात घेऊन व्यूहरचना आखली आहे. पंढरपूर व मंगळवेढ्यातील प्रचारासाठी त्यांनी दोन दिवसांचा दौरा सुरू केला आहे. काल गुरुवारी त्यांनी भाजपमध्ये असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर गादेगाव, खर्डी आणि कासेगाव अशा तीन ठिकाणी जंगी सभा घेतल्या. केवळ सभा करून ते थांबले नाहीत तर त्यांनी पंढरपूरमधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर, मनसेचे शाडो कॅबिनेटमधील सहकारमंत्री दिलीप धोत्रे आणि परिचारक यांचे कट्टर समर्थक असलेल्या नगराध्यक्षा साधना भोसले, त्यांचे पती नागेश भोसले यांच्या निवासस्थानी भेट दिली. रात्री त्यांनी आमदार संजय शिंदे यांच्या फार्म हाउसवर मुक्काम करून सोलापूर जिल्ह्याच्या आगामी राजकारणाची खलबते केली. 

आज (शुक्रवारी) सकाळी पुन्हा त्यांनी मंगळवेढ्याकडे जाताना राष्ट्रवादीचे त्यांचे जुने सहकारी आणि गेल्या काही वर्षांपासून भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी जवळीक असलेल्या सी. पी. बागल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. मागील काळात भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून चांगले काम केलेले श्रीकांत बागल यांनी वडिलांच्या उपस्थितीत श्री. पवार यांचे स्वागत केले. याप्रसंगी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे उपस्थित होते. 

आज दिवसभरात मंगळवेढा तालुक्‍यात ठिकठिकाणी सभा घेऊन आणि पंढरपूरप्रमाणे तेथील परिचारक, मोहिते- पाटलांच्या संपर्कात असलेल्या मंडळींच्या गाठीभेटी घेणार आहेत. 

एकंदरीत, श्री. पवार यांनी भगीरथ भालके यांना (कै.) भारत भालके यांच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी शक्‍य असेल त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतलेली दिसत आहे. अजित पवारांच्या बेरजेच्या राजकारणामुळे आता भाजप नेत्यांना अधिकच धावपळ करावी लागणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com