Solapur : बदललेले अजितदादा,आत्मक्लेष ते स्वराज्यरक्षकच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

Solapur : बदललेले अजितदादा,आत्मक्लेष ते स्वराज्यरक्षकच

Solapur- पूर्वी राजकारणात नेत्यांनी दिलेला शब्द कार्यकर्त्यांसाठी प्रमाण आणि विश्‍वास होता. बदलत्या राजकारणात शब्दातही राजकारण शिरले आहे. शब्द हा पाळण्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांची तात्पुरती समजूत काढण्यासाठी द्यायचा असतो हीच प्रथा सध्याच्या राजकारणात दिसत आहे. एखादे काम होय किंवा नाही

या भाषेत थेट सांगण्याची पध्दत अजित पवार यांच्याकडे असल्याने त्यांच्यातील हे वेगळेपण राजकारणात येणाऱ्या युवा व नव्या कार्यकर्त्यांना भावताना दिसत आहे. मी बघतोच तू यंदा आमदार कसा होतो ते, हे तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिलेले जाहीर आव्हान पूर्ण करण्यासाठी अजित पवार यांनी राष्ट्रवादी लढत असलेला पुरंदर विधानसभा मतदार संघ वेळप्रसंगी काँग्रेसला दिला.

संजय जगतापांच्या पाठीशी राष्ट्रवादीची व इतर सर्व ताकद वैयक्तिकरित्या लावून हा शब्द खरा करून दाखविल्याचेही महाराष्ट्राने पाहिले आहे.राज्याच्या राजकारणात अजित पवार हे नाव नेहमीच चर्चेत आणि निर्णय प्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असोत की विधानसभेचे विरोधी पक्षनेते. त्यांच्या वाक्याची अन्‌ कृतीची चर्चा होते आणि त्याची दखलही घेतली जाते.

२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने गमावलेली राज्यातील सत्ता, २०१९ मध्ये अनपेक्षितपणे पुन्हा मिळालेली सत्ता अन् २०२२ मध्ये विरोधी बाकावर बसण्याची राष्ट्रवादीवर पुन्हा आलेली वेळ, या सर्व कालखंडात अजित पवार यांनी स्वत:मध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यांनी केलेल्या या बदलांमुळे त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.

चुकीच्या वक्तव्यावर आत्मक्लेष करण्याचा त्यांचा निर्णय असो की त्यांच्या दृष्टीने बरोबरच असलेल्या स्वराज्यरक्षक या भूमिकेचे त्याच आत्मविश्‍वासाने जाहीर सभांमधून वारंवार केले जाणारे समर्थन असो, त्यांची ही स्टाइल महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच दिसत आहे. ही स्टाइल बहुजन समाजात विशेषतः तरुणांमध्ये अजित पवार यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढवताना दिसत आहे.

- प्रमोद बोडके

राजकारणात, समाजकारणात काम करताना अनेकदा नेत्यांची जीभ घसरते. वेळ आल्यावर ते म्हणतात, मला असं बोलायचं नव्हतं, माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मीडिया काटछाट करून दाखवते, ही मराठी भाषा आहे, जिकडे वळेल तिकडे वळते. यासह पळवाट काढण्यासाठी अनेक कारणे शोधली जातात.

अजित पवार यांनी मात्र जे चुकलं त्याची आत्मक्लेशाच्या माध्यमातून माफी मागून आणि जे बरोबर आहे ते विधीमंडळात आणि बाहेर जाहीर सभेत ठणकावून सांगितले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल असलेला धर्मवीर की स्वराज्यरक्षक हा विषय, असो की दादोजी कोंडदेव यांचा पुतळा अन्‌ वाघ्या कुत्र्याचा विषय असो, यामध्ये अजित पवार यांनी सुरवातीला घेतलेली भूमिका शेवटपर्यंत ठाम दिसली.

महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलण्याचे विषय ताजे असतानाच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील विधीमंडळाच्या अधिवेशनात तेही थेट सभागृहातच छत्रपती संभाजी महाराज यांचा विषय का उपस्थित केला?, त्यांना या विषयातून नक्की काय साध्य करायचे आहे? हे अजूनही अनुत्तरीतच आहे.\

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असा उल्लेख विधिमंडळ सभागृहात करताना अजित पवार यांचा जो आत्मविश्‍वास होता तोच आत्मविश्‍वास सध्या जाहीर सभांमधूनही दिसत आहे.

आपल्याला जी गोष्ट पटते त्याला आपण लगेच एस म्हणतो, परंतु कोणी उठून जर माफी मागा म्हटला तर माफी मागायला मी काय मोकळा नाही, असे सांगत अजित पवार सध्या स्वराज्यरक्षकच या भूमिकेतून राज्यातील सध्याचे जनमानस तर तपासत नाहीत ना? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.