
अक्कलकोटमध्ये रमजानसाठी लॉकडाउन शिथिलता नाही पण साहित्य घरपोच देण्यास सहकार्य !
अक्कलकोट (सोलापूर) : रमजान ईदच्या (Ramjan Eid) पार्श्वभूमीवर खास बाब म्हणून लॉकडाउन (Lockdown) शिथिल करता येणार नाही; मात्र किराणा, फळे, दूध घरपोच पोचवण्यासाठी सहकार्य करू, असे स्पष्ट प्रतिपादन पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी केले. या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांत अधिकारी दीपक शिंदे होते. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळावी यासाठी नगरपरिषद विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाज (Muslim Community) शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय अक्कलकोट येथे खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. (Akkalkot does not have lockdown relaxation but will get help to deliver the material home)
हेही वाचा: जिल्ह्यातील भाजपचे खासदार-आमदार करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण !
नगर परिषद विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर सलग दोन दिवस दोन-दोन तास लॉकडाउनला शिथिलता मिळावी, ज्यामुळे सणासाठी किराणा, दूध, फळे आदी खरेदी करता येऊ शकतील, अशी मागणी केली. तर नगरसेवक आलम कोरबू यांनी दोन तासांचा वेळ अपुरा असून पाच ते सहा तासांची सवलत मिळावी अशी मागणी केली. मौलाना इरफान दावण्णा यांनी नमाजासाठी पाच लोकांची अट रद्द करून किमान दोन-चारशे लोकांना संधी मिळावी अशी मागणी करून ते म्हणाले, एक वेळ नवीन कपड्यांऐवजी जुन्या कपड्यांचा वापर करू. दूध मिळाले नाही तर पाणी पिऊन सण साजरा करू मात्र नमाजासाठी सवलत मिळावी. नबीलाल शेख म्हणाले, कोणती नमाज शेवटची ठरेल हे सांगता येत नाही, त्यामुळे ईदसाठी सवलत मिळावी.
हेही वाचा: महापालिका प्रशासन भारावले ! कारण, "त्या' शिक्षकाने मागितली पुन्हा कोरोना ड्यूटी
या सर्व चर्चेनंतर प्रांत अधिकारी दीपक शिंदे आणि पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी, कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहता लॉकडाउन शिथिल करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्याऐवजी ईदसाठी लागणारे किराणा साहित्य, फळे आणि दूध हे संबंधितांना ऑर्डर देऊन घरपोच करण्याकामी सहकार्य करू. याकामी संबंधित प्रभागातील नगरसेवकांचे मोजकेच कार्यकर्ते प्रतिनिधी म्हणून काम करतील तसेच पोलिस प्रशासन आणि नगर परिषद याकामी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.
या बैठकीत प्रभारी प्रांत अधिकारी श्रीमती डांगे, तहसीलदार अंजली मरोड, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, सलीम यळसंगी यांनी मनोगते व्यक्त केली. बैठकीला मुख्याधिकारी सचिन पाटील, पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, गोपनीय विभागाचे धनराज शिंदे, ज्येष्ठ नेते गफूर शेरीकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, नगरसेवक महेश हिंदोळे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, शिवराज स्वामी, माणिक बिराजदार, समीर शेख, मलिक बागवान आदी उपस्थित होते.
Web Title: Akkalkot Does Not Have Lockdown Relaxation But Will Get Help To Deliver The Material
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..