
महापालिका प्रशासन भारावले ! कारण, "त्या' शिक्षकाने मागितली पुन्हा कोरोना ड्यूटी
सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात अनेक सरकारी कर्मचारी व शिक्षकांना कोरोनाची ड्यूटी (Corona Duty) म्हणजे एक कटकट वाटते. पण एका शिक्षकाने याला छेद देत आपल्या कोव्हिड कामाची मुदत संपल्यावर देखील पुन्हा आपल्याला हे काम देण्याची मागणी केली आहे. हे पाहून महापालिका प्रशासन भारावून गेले आहे. (The municipal administration was overwhelmed to see the teacher demanding corona duty again)
हेही वाचा: पाकिस्तानबरोबरच्या दोन युद्धात सहभागी 89 वर्षीय योद्ध्याने जिंकली आता कोरोनाविरुद्धचीही लढाई !
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी व वैद्यकीय यंत्रणा झटत आहे. त्यामध्ये अनेक घटक सहभागी झाले आहेत. बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना संदर्भातील ड्यूटी आहे. याशिवाय आशा, फ्रंटलाइन वर्कर्स यांच्या बरोबरच शिक्षक देखील कोरोना युद्धात सहभागी झाले आहेत. वास्तविक कोरोना ड्यूटी टाळण्याचा प्रयत्न अनेक शिक्षकांचा असतो. या जबाबदारीमुळे आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तसेच त्याचा फटका आपल्या कुटुंबाला बसू शकतो, अशी त्यांची भावना असते. म्हणूनच अनेक शिक्षक कोरोना ड्यूटी संदर्भातील आदेश आल्यावर ते रद्द करण्यासाठी आटापिटा करताना दिसून येतात.
हेही वाचा: कोरोनाची तमा न बाळगता "जय हिंद'चे अविरत कार्य ! 16500 भुकेल्यांना केले अन्नवाटप
मात्र, शिक्षक अमितकुमार जाधव याला अपवाद ठरले आहेत. ते सुशील मराठी शाळेत सहशिक्षक आहेत. त्यांना महापालिकेच्या रामवाडी नागरी आरोग्य केंद्रात कोरोना ड्यूटी देण्यात आली होती. यानुसार त्यांनी आपली सेवा बजावली. त्याची मुदत संपल्याने त्यांना कार्यमुक्तही करण्यात आले. यानंतर त्यांनी स्वेच्छेने हे काम आपल्याला पुन्हा देण्यात यावे, या मागणीसाठी महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे विनंती अर्ज केला आहे. हे पाहून महापालिका प्रशासन भारावून गेले आहे.
हेही वाचा: सोलापूरच्या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन अन् रस्त्यावरच्या लढाईचा निर्धार !
कोरोना युद्धात शिक्षकांसह सर्वांचे योगदान आहे, मात्र सरकारी कर्मचारी, डॉक्टर, आशा वर्कर्स आदींना यासंदर्भात मोठी प्रसिद्धी मिळत आहे. शिक्षकांचे योगदान दुर्लक्षित आहे. या युद्धात शिक्षकांचाही बळी जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मी पुन्हा कामाची मागणी केली आहे.
- शिक्षक अमितकुमार जाधव
एका बाजूला कोरोना संदर्भात ड्यूटी नको असे बहुतेक कर्मचारी म्हणतात. वशिला लावून ड्यूटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करतात. अशा वेळी ड्यूटी संपली तरी पुन्हा स्वच्छेने कोरोना ड्यूटी द्या म्हणणारे शिक्षक विरळच आहेत. त्यापैकी अमितकुमार जाधव हे एक आहेत. अशांचे कौतुक केलेच पाहिजे.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, महापालिका
Web Title: The Municipal Administration Was Overwhelmed To See The Teacher Demanding Corona Duty
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..