esakal | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत शह-काटशह ! साम-दाम-दंडाचे हत्यार
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत शह-काटशह ! साम-दाम-दंडाचे हत्यार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच, या जिद्दीने दोन्ही बाजूचा प्रचार सुरू आहे. साम, दाम, दंड ही नीती वापरून विरोधकांना शह दिला जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील चूरस कमालीची वाढली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान आवताडे यांच्यातील अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याविषयी उत्सुकता आहे.

प्रचारात कोरोना नियमांचा फज्जा

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक, दोन नव्हे तर प्रत्येकी सहा, सात सभा घेतल्या. अजित पवार यांनी तर तीन वेळा पंढरपूरचा दौरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ न देता प्रचार करण्याचे आव्हान दोन्ही प्रमुख पक्षांपुढे होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सभा घेतल्या आणि मग आम्ही देखील काही कमी नाही, असे दाखवत भाजपने देखील सभा घेतल्या. गर्दीमुळे कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडाला. सर्वसामान्य लोकांनी नियमांकडे दुर्लक्ष केले तर दंड वसूल केला जात असताना दुसरीकडे मात्र प्रचंड गर्दीत राजकीय पक्षांनी सभा घेतल्या. अशा सभा होऊच नयेत यासाठी कडक निर्बंध घालण्याऐवजी सभा झाल्यानंतर एखाद्या संयोजकावर गुन्हा दाखल करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली.

दिग्गज नेते प्रचारात

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अनेक वेळा दौरे केले. त्यांच्या शिवाय धनंजय मुंडे, उदय सामंत, गुलाबराव पाटील या मंत्र्यांनी आणि आमदार रोहित पवार, आमदार संजय शिंदे, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आदींनी अनेक सभा घेऊन भगीरथ भालके यांना बळ दिले.

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, लक्ष्मण ढोबळे, बाळा भेगडे, सदाभाऊ खोत, प्रा. राम शिंदे हे सर्व माजी मंत्री तसेच खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभा घेतल्या. भाजपचे श्रीकांत भारतीय, धैर्यशील मोहिते- पाटील आदी पदाधिकारी पंढरपुरात तळ ठोकून आहेत. आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी त्यांची सर्व यंत्रणा समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभी केल्याने त्यांना मोठी ताकद मिळाली आहे. भाजपचे स्टार प्रचारक आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या बरोबरीने आवताडे यांच्या प्रचाराला वेग दिला होता. परंतु श्री. मोहिते- पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नाइलाजास्तव क्वारंटाइन व्हावे लागले.

अजितदादांचे बेरजेचे राजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यापासून या निवडणुकीत लक्ष घातले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांतील मतभेद लक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ते आले. त्यानंतर पुन्हा त्यांनी दोन दिवस पंढरपूर- मंगळवेढ्यात सभा घेण्यासाठी दौरा केला. कल्याणराव काळे यांना त्यांनी राष्ट्रवादीमध्ये घेतले. अनेकांच्या घरी जाऊन त्यांनी सदिच्छा भेटी देत बेरजेचे राजकारण केले. बुधवारी ते पुन्हा प्रचारासाठी आल्याने भगीरथ भालके यांची बाजू अधिक भक्कम झाली. आमदार रोहित पवार यांनीही केवळ सभा घेऊन न जाता अनेकांच्या घरी भेटी देऊन संवाद साधल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला.

दोन्ही पक्षांकडून निवडणूक प्रतिष्ठेची

महाविकास आघाडीचे सरकार हे महावसुली सरकार आहे, अनेक मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक केलेली असल्याने या सरकारच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन भाजपकडून केले गेले. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. भगीरथ भालके यांना संधी दिली तर ते राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या बाजूचे आमदार म्हणून विधानसभेत जातील आणि मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागतील, त्यामुळे त्यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादीकडून केले गेले.

गोडसे, शिंदे, सिद्धेश्वर आवताडेंमुळे रंगत वाढली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला असताना या निवडणुकीत मात्र पाठिंबा न देता संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांना मैदानात उतरवले. माजी खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांनी शिंदे यांच्यासाठी अनेक सभा घेतल्या.

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख म्हणून धडाडीने काम केलेल्या शैला गोडसे यांनी होम टू होम प्रचारावर भर दिला. त्यांच्या प्रचारासाठी नियोजनबद्ध काम केले जात आहे. अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांचाही रिक्षांमधून ध्वनिवर्धकातून प्रचार सुरू आहे. या उमेदवारांशिवाय निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अन्य उमेदवारांचा प्रचार तुलनेने नगण्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे यांच्यातच अटीतटीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संपादन : श्रीनिवास दुध्याल

बातमीदार : अभय जोशी