'स्वामीभक्तांच्या सोयीसाठी 'कनेक्‍टिव्हिटी'ची गरज' | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'स्वामीभक्तांच्या सोयीसाठी "कनेक्‍टिव्हिटी'ची गरज'
'स्वामीभक्तांच्या सोयीसाठी 'कनेक्‍टिव्हिटी'ची गरज'

'स्वामीभक्तांच्या सोयीसाठी 'कनेक्‍टिव्हिटी'ची गरज'

सोलापूर : जगभरातील स्वामीभक्तांना (Swami Samarth) अक्कलकोट (Akkalkot) दर्शनाची आस लागलेली असते. स्वामीभक्तांच्या सोयीसाठी दक्षिण भारतात (South India) जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांसह बुलेट ट्रेनलाही (Bullet Trian) अक्कलकोटमध्ये थांबा असणे आवश्‍यक आहे; तसेच सोलापूर येथे विमानसेवा (Airport) सुरू झाल्यास अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांना लाभ होईल. शहराच्या कनेक्‍टिव्हिटीत वाढ होणे आवश्‍यक आहे, असे मत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले (Amolraje Bhosle) यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: ST कर्मचाऱ्यांना 150 कोटी वाढीव वेतन! संप मिटवण्यासाठी तीन पर्याय

'सकाळ' कार्यालयात 'कॉफी विथ सकाळ'मध्ये ते बोलत होते. प्रारंभी 'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी अमोलराजे भोसले यांनी अक्कलकोटच्या विकासात अन्नछत्र मंडळाचे योगदान स्पष्ट केले. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजयराजे भोसले यांनी 1988 साली अवघ्या तीन किलो तांदळापासून अन्नछत्र सुरू केले. आज एक हजार भक्तांची पंगत एकाच वेळी महाप्रसाद घेऊ शकते. दररोज 20 ते 30 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.

पर्यटकांच्या नकाशावर अक्कलकोट

धार्मिक, ऐतिहसिक वारसा लाभलेले अक्कलकोट शहर हे पर्यटनाच्या नकाशावर आता ठळकपणे कोरले आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्यामुळे नावारूपाला आलेल्या अक्कलकोटमध्ये अन्नछत्र मंडळाने शिवसृष्टी, शिल्पसृष्टी, बालोद्यान यासह विकसित केले आहे. भाविक, चालक ,वाहक यांच्यासाठी उत्तम सोयीसुविधा आहेत. यामुळे गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर तीर्थस्थळांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अक्कलकोट येथे भाविकांचा ओढा वाढला आहे. एकेकाळी वर्षाला दहा हजार भाविक अक्‍कलकोटला भेट देत असत, सध्या नियमित 20 ते 30 हजार भाविक अक्कलकोटला भेट देत आहेत. धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर अक्कलकोटने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

कोरोनाकाळात अन्नछत्र मंडळाची मदत

कोरोनामुळे जवळपास दोन वर्षे भाविकांसाठी मंदिर बंद होते. मात्र, 'अन्नछत्र'चे काम बंद नव्हते. अन्नछत्र मंडळातर्फे अक्कलकोट शहरातील हजारो गरजूंना अन्नदान करण्यात आले. अनेकांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. पुणे शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांसाठी अन्नछत्र मंडळाने धाव घेतली, नाटक, संगीताचे कार्यक्रम बंद असल्याने नाट्य, संगीत क्षेत्रातील अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळी आली होती. त्यांना अक्कलकोटहून धान्य व जीवनावश्‍यक वस्तू पाठवण्यात आल्या. किल्लारी भूकंपग्रस्त तसेच चिपळूण येथील महापूर, सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. कोणत्याही नैसर्गिक अपत्तीवेळी अन्नछत्र मंडळाने सढळ हाताने मदत केली. अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील पूरग्रस्तांनाही मदत केली.

सामाजिक कार्यात सहभाग

अन्नछत्र मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दर आठवड्याला हजारो दात्यांनी रक्तदान केले आहे. भविष्यात स्वत:ची रक्तपेढी सुरू करण्याचा अन्नछत्र मंडळाचा मानस आहे. शहरातील फत्तेसिंह मैदानाचे सुशोभीकरण केले. एक एकर जागेत बाग, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे, शिवसृष्टीची उभारणी, सोलापूर ते अक्कलकोट मार्गावर वटवृक्षांसह देशी झाडांची लागवड व संगोपन करून सामाजिक कार्यातही ठसा उमटवला आहे. शहराच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गळोरगी येथे विहीर खोदून पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण केली आहे.

सुरक्षेच्या सुविधा

अन्नछत्र मंडळाकडे 300 सेवेकरी असून 50 सिक्‍युरिटी गार्ड आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी परिसरात 300 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीमुळे अनेकांच्या मौल्यवान वस्तूंबरोबरच हरवलेली लहान मुलेही सापडली आहेत. लवकरच भाविकांच्या सेवेसाठी अद्ययावत पाच मजली भोजन कक्ष सुरू होणार आहे. यामध्ये प्रतीक्षागृह असेल तसेच कोरोनासारख्या आपत्तीकाळात सुटसुटीतपणे भोजनाचा लाभ घेता येणार आहे. आजही एकाचवेळी एक हजारजण महाप्रसाद घेऊ शकतात. दुपारी 12 ते चार ही महाप्रसादाची वेळ असली तरी उशिरा येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते. अन्नछत्रसाठी अन्नदान करणारे पाच हजाराहून अधिक दाते आहेत.

हेही वाचा: बार्शीचा पैलवान मनोज माने म्हणतो, 'महाराष्ट्र केसरी' जिंकणारच!

ऑनलाइन दर्शन

आधुनिकतेची कास धरून अन्नछत्र मंडळाने समाज माध्यमातील सर्व प्लॅटफॉर्मवर स्वत:चे खाते तयार केले आहे. ऑनलाइन दर्शनाबरोबर महाप्रसादाचे ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. www.swamiannacchatra.org या वेबसाईटवर जाऊन तेथे असलेल्या ऑनलाइन महाप्रसाद बुकिंगवर क्‍लिक करावे. ज्या तारखेसाठी महाप्रसाद घ्यावयाचे आहे त्या तारखेवर क्‍लिक करावे. नंतर येणारा फॉर्म भरावा आणि सबमिट करावा. फॉर्म सबमिट केल्यावर आपणास एक क्‍यूआर कोड मिळेल, तो डाउनलोड करावा आणि तो क्‍यूआर कोड प्रवेशावेळेस प्रवेशद्वारावर दाखवल्यास भाविकांना वेटिंग करावे लागणार नाही, अशा अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

loading image
go to top