
पेनुर हद्दीतील उजनी डाव्या कालव्यात आढळला अनोळखी मृतदेह
मोहोळ - पेनुर, ता. मोहोळ हद्दीतील उजनी डाव्या कालव्यात मंगळवार, ता. 14 जून रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. यामुळे पेनूर परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या उजनी धरणातून उजनीच्या डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. मंगळवारी, ता. 14 जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पेनूर शिवारातील माळी फाटा ते पाटील वस्ती दरम्यानच्या कालव्यातील लोखंडी पाईपला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आडकल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिस ठाण्याच्या पेनूर बिटचे अंमलदार सहायक फौजदार लोबो चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. कालव्यात 15 फुटांपेक्षा जास्त खोल पाणी असून त्याचा प्रवाह तीव्र असल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगीतले. मृतदेह लोखंडी पाईपला अडकलेला असल्यामुळे पाण्यावर तरंगत असून सडलेल्या अवस्थेत आहे.
त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व विजार असून त्याचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे आहे. तो मृतदेह नेमका कुणाचा व कुठला आहे तसेच हा प्रकार आत्महत्या की हत्या या बाबतची माहिती मृतदेह बाहेर काढून पोलिस तपास केल्यावरच समजणार आहे. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत मोहोळ पोलिसात घटनेची नोंद करण्यात आलेली नव्हती. दरम्यान मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे शवविच्छेदन जागेवरच करावे लागणार असल्याचे अंमलदार चव्हाण यांनी सांगीतले.
Web Title: An Unidentified Body Was Found In The Left Canal Of Ujani
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..