Solapur News : पापरी परिसरात बिबट्या सदृष्य प्राणी दिसल्याने नागरिकात घबराट; कुत्र्याचे पिल्लू नेले उचलून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

Solapur News : पापरी परिसरात बिबट्या सदृष्य प्राणी दिसल्याने नागरिकात घबराट; कुत्र्याचे पिल्लू नेले उचलून

मोहोळ : गेल्या दोन दिवसांपूर्वी कोन्हेरी ता मोहोळ येथील जरग व माने वस्ती परिसरात धुमाकूळ घातलेल्या बिबट्या सदृश्य प्राण्यानी आता पापरी ता मोहोळ येथील गावालगत असलेल्या नागनाथ टेकळे यांच्या केळी पिकात दर्शन दिल्याने मोठी घबराट पसरली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, गावा जवळच दोन बिबट्या सदृश्य प्राण्यांचे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दर्शन झाले. सुनंदा लोंढे यांच्या घरा समोरील पाळीव कुत्र्याच्या पिलाला एका प्राण्याने उचलून नेल्याने नागरीक घाबरले आहेत. चक्क नागरी वस्तीत हे प्राणी आल्याने महिला वर्गात प्रचंड भीती बसली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, मंगळवार ता 28 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नागनाथ टेकळे यांच्या असलेल्या ऊसाच्या शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी सचिन माने हा गेला होता. त्यास प्रथम एका बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाले,त्याने लगेच नागनाथ टेकळे यांचे चिरंजीव बाळासाहेब टेकळे यांना आवाज दिला,

वस्तीवरचे शेतकरी काठ्या घेऊन धावत आले असता, सदर प्राणी धावत वस्ती मागे दबा धरून बसला असलेला पशुपालक गणेश फराटे,सुहास काजळे,दाजी डोंगरे व अन्य रहिवाशांनी पाहिले. ओरडा झाल्यावर नागरीक बॅटऱ्या घेऊन त्याच्या मागे धावत सुटल्यावर तो केळीच्या पिकात अंधारात निघून गेला.

याची चर्चा सुरु असतानाच टेकळे यांच्या वस्तीपासून थोड्या अंतरावर असलेल्या सुनंदा लोंढे यांच्या वस्तीवर या बिबट्या सदृश्य दोन प्राण्यानी एका कुत्र्याच्या तीन महिने वय असलेल्या पिलाला तोंडात धरून पळवून नेल्याचे त्यांनी समक्ष पाहिले.

बिबट्या सदृश्य दोन प्राणी एकाच वेळी आणि कुत्र्याच्या पिलाला तोंडात धरलेले दृश्य पाहून सुनंदा यांच्या अंगाचा थरकाप उडाला. त्यांनी लगेच घराचे दार बंद करून घेतले,व ते प्राणी गेल्यावर शेजारच्या वस्तीवर गेल्या.

दरम्यान तो पर्यंत बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.त्यांना प्राण्याचे वर्णन विचारले असता त्या म्हणाल्या आपण टिव्हीत पाहतो तसाच मी पाहिलेला प्राणी आहे. तो दिसायला बिबट्या सारखाच असून त्याच्या अंगावर काळे मोठे ठिपके आणि तांबूस रंगाचे केस आहेत.

दरम्यान आलेल्या बध्यांनी शेतातील ओल्या जागेत उमटलेले बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठशांचे मोबाईल मध्ये फोटो काढुन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठविले आहेत. दोन दिवसांपूर्वी कोन्हेरी परिसरात एका बोकडावर हल्ला केला होता, आता या प्राण्यानी आपला मोर्चा थेट मानवी वस्तीवरच वळविल्यांने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.

दरम्यान पापरी आणि परिसरात सध्या शेतीला पाणी देण्यासाठी उजनी कालव्याला पाणी सुटले आहे. मात्र रात्रीची लाईट असल्याने पिकाला पाणी देणे अडचणीचे झाले आहे. अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी गावात असलेल्या दूध डेरीना दूध वाढण्यासाठी येतात, त्यांच्यातही मोठी घबराट बसली आहे. तातडीने ते दूध वाढून झाल्यानंतर आपली वस्ती गाठल्याचे दिसत आहेत. वनविभागाने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.

टॅग्स :SolapurLeopardanimalDog