
मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्यातील गौडगावची कन्या व श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगाव संचलित श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, कृष्णानगरची विद्यार्थिनी अश्विनी सहदेव कणेकर हिने गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावत देदीप्यमान कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अश्विनीच्या या यशाने "जिकडे बार्शी तिकडे सरशी' हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अश्विनी कणेकरने गेट - 2021 परीक्षेत 79.67 टक्के गुणांसह बाजी मारली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे घेण्यात आलेल्या गेट परीक्षेत आठ लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात 17 टक्के रिझल्ट लागला असून, अश्विनी कणेकर हिने
1000 पैकी 945 गुण मिळवत टेक्स्टाईल विभागातून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
गौडगाव (ता. बार्शी) येथे जन्मलेल्या अश्विनीने प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण श्री नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, कृष्णानगर, पुणे येथे पूर्ण केले. डीकेटी शिक्षण संस्था, इचलकरंजी येथे गेट परीक्षेची तयारी करीत तिने हे उज्ज्वल यश संपादन केले आहे. श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, कृष्णानगर येथे आई-वडिलांसोबत तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे सहसचिव हेमंत गडसिंग, उपाध्यक्ष प्रमोद जगताप, प्राचार्य एच. डी. मोरे, उपप्राचार्य एस. एस. तिकटे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षणाशिवाय आपण काहीच करू शकत नाही, उच्च शिक्षण घेतले तर उच्च पदापर्यंत पोचता येते, त्यातून पुढे देशाची व समाजाची सेवा करता येते, हा विचार समोर ठेवत अश्विनीने गेट परीक्षेत देशात प्रथम येत आई- वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. गौडगाव येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अश्विनी कणेकरची घरची परिस्थिती बेताचीच असल्याने वडील सहदेव कणेकर यांनी पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला व पुढे मुलांचे शिक्षण सुरू ठेवले. गेट परीक्षेची तयारी करीत असताना गतवर्षी कोरोना महामारीचा संसर्ग वाढला. त्यात अश्विनीला कोरोनाने ग्रासले. तरीही ती डगमगली नाही, खचली नाही. कोरोनावर यशस्वी मात करीत जिद्दीने व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेली. घरी किराणा दुकानाचा व्यवसाय असल्याने अश्विनी कणेकरने वेळप्रसंगी आई वंदना कणेकर व वडील सहदेव कणेकर यांना दुकान चालविण्यास मदतही केली व अभ्यासातही सातत्य ठेवले.
घड्याळी 14 तास अभ्यास करीत गेट परीक्षेत यशाचे शिखर गाठले. या देदीप्यमान कामगिरीबद्दल आमदार प्रकाश आवाडे, श्री नर्मदेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्ही. बी. पिसाळ, सचिवा सखूबाई गडसिंग, खजिनदार ज्ञानदेव आगलावे, सहसचिव हेमंत गडसिंग, उपाध्यक्ष प्रमोद जगताप तसेच गौडगाव ग्रामस्थांच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.