esakal | लढाई पंढरीची अन्‌ सैन्य मात्र माढ्याचे ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Mohite-Patil

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालत आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांना एकत्र आणले. आवताडेंसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, खासदार रणजित नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी आमदार संजय शिंदे हे देखील या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. 

लढाई पंढरीची अन्‌ सैन्य मात्र माढ्याचे ! 

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालत आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांना एकत्र आणले. आवताडेंसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, खासदार रणजित नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी आमदार संजय शिंदे हे देखील या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक रणधुमाळीच्या मैदानात एकूणच माढ्याचे सैनिक मैदान गाजवत असल्याचे दिसून येत आहे. 

2009 च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी घेतल्याने मोहिते पाटलांचा पराभव झाला असला तरी 2014 च्या विधानसभेत मोहिते- पाटील समर्थकांनी निर्णायक भूमिका बजावली होती. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांनी अर्ज दाखल केल्यानंतर, आमदार संजय शिंदेंनी स्व. भारत भालके यांनी आपल्याला लोकसभेत केलेल्या मदतीची जाणीव ठेवून आपण त्यांना विधानसभेत मदत करण्यासाठी या मतदारसंघात प्रचार सभेसाठी येणार असल्याचे सूतोवाच केले. 

तर भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी शिवरत्न बंगल्यावर विजयसिंह मोहिते- पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. त्या वेळी त्यांच्या समवेत मंगळवेढ्यातील मोहिते- पाटील समर्थक उपस्थित होते. त्या वेळी मोहिते- पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना समाधान आवताडे यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. तत्काळ मंगळवेढ्यात सक्रिय होत आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील म्हणाले, स्वतः विजयदादा या मतदारसंघात येणार आहेत, मी स्वतः देखील या मतदारसंघामध्ये ठाण मांडून आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही जागा विजयी करण्यासाठी वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार दोन मोठे नेते एकत्र आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा एक- दोन पाऊल मागे- पुढे होऊन आवताडे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. शिवाय 35 गावांचा प्रश्न सोडवण्यासाठी विजयसिंह मोहिते- पाटलांनी केलेले प्रयत्न सांगत आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील भाजप उमेदवाराला निवडून देणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी या मतदारसंघाचा दौरा केला. मोहिते- पाटलांना मानणारा वर्ग या मतदारसंघात असल्यामुळे त्याचा फायदा होण्याची शक्‍यता आहे. 

आमदार संजय शिंदे यांना मानणारा वर्ग कमी असला तरी त्यांनी भगीरथ भालके यांच्या विजयासाठी खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, संजय शिंदे यांनी मंगळवेढा शहराबरोबर ग्रामीण भागात सक्रिय होत राष्ट्रवादीच्या उमेदवारास विजयी करण्याचे आवाहन करण्यास सुरवात केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top