जन्मत:च एका डोळ्याने अंध महेश मस्केच्या पेंटिंग व पिंपळपानावरील कलाकृतीने घातली भुरळ ! 

Maske
Maske

मळेगाव (सोलापूर) : एव्हरेस्टवीर अरुणीमा सिन्हा, बॅडमिंटनपटू गिरीश शर्मा, साईप्रसाद विश्वनाथन, इरा सिंघल, जिल्हाधिकारी रमेश घोलप, चित्रकार महेश मस्के यांनी अपंगत्वावर मात करीत असाध्य ते साध्य करून यशाचे शिखर गाठले. जिद्द, मेहनत, चिकाटी व कलेविषयी प्रेम व आवड असणाऱ्या, एका डोळ्याने अंध असलेला चित्रकार महेश मस्के याचा जीवनप्रवासही असाच थक्क करणारा आहे. 

बार्शी तालुक्‍यातील जामगावसारख्या छोट्याशा खेड्यात, शेतकरी कुटुंबात जन्मलेला चित्रकार महेश मस्के इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. जन्मत:च एका डोळ्याने अंध असलेल्या महेशच्या डोळस पेंटिंगने व पिंपळाच्या पानावरील कलाकृतीने अनेकांना भुरळ घातली आहे. एक उत्कृष्ट चित्रकार, शिल्पकार, शेतकरी, वृक्षमित्र व प्राणीमित्र म्हणून जीवन जगताना अपंगत्वावर मात करीत समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

लॉकडाउन काळात अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, रोजगार बुडाले; मात्र अशाही कठीण परिस्थितीत महेशने जगण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. पिंपळाच्या पानावर कलाकृती काढण्याची कला जोपासत उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला. त्यास संपूर्ण राज्यभरातून मोठी मागणी मिळत आहे. मेजर सुनील काळे,आमदार भारत भालके, डॉ. शीतल आमटे यांना पोट्रेट पेंटिंगद्वारे वाहिलेली आदरांजली, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार शरद पवार, समाजसेवक अण्णा हजारे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिग-बी अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, खासदार सुप्रिया सुळे, छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, खासदार अमोल कोल्हे, गिरीश महाजन, रूपाली चाकणकर यांच्या साकारलेल्या हुबेहूब कलाकृतीने अनेकांच्या मनात घर केले आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर हे राज्याच्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करीत असताना महेशची चित्रकला व कलाकृती मात्र त्यांच्या नजरेतून दुर्लक्षित झाली नाही. मान्यवरांनी महेशला जवळ बोलावून घेत रेखाटलेल्या हुबेहूब चित्रकृतीचे कौतुक केले. तसेच मुलगी वाचवा - देश वाचवा, किल्ले संवर्धन, स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र लॉकडाउनची कलाकृती, शिवराज्याभिषेक सोहळा यांसारख्या कलाकृती सादर करत एक सामाजिक संदेश देण्यास देखील तो विसरला नाही. 

पुढे जामगाव या त्याच्या मूळगावी कुत्र्याच्या पिल्लांचं मायेचं छत्र हरवल्यानंतर महेश मस्केने दाखवलेली जीवदया अनेकांनी जवळून पाहिली आहे. आजही त्या सर्व पिल्लांचा तो योग्यरीत्या सांभाळ करीत आहे. त्यामुळेच आज जागतिक अपंग दिनी महेश मस्केचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. 

मानवरूपी जीवन हे परमेश्वराकडून मिळालेल एक अमूल्य वरदान आहे. जीवनामध्ये संकटे येत असतात व जात असतात. त्यात दाखवायचा असतो तो संयम व धीरोदात्तपणा. वाढत्या अपेक्षांचं ओझं, जीवघेणी स्पर्धा, संवादाचा अभाव यामुळे दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीशी, वस्तुस्थितीशी समायोजन साधत जगण्याचा मार्ग शोधता आला पाहिजे, असे मत चित्रकार महेश मस्के याने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com