
Barshi News : फटाके कारखान्यातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
बार्शी - पांगरी (ता. बार्शी) येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला (ता. १ जानेवारी) रोजी शोभेचे फटाके उत्पादन करणाऱ्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये पाच महिला कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख अशी २५ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
गंगाबाई सांगळे, मोनिका भालेराव, मिनाबाई मगर, सुमन जाधवर, कौशल्या बगाडे या पाच महिला कामगारांचा १ जानेवारी २०२३ रोजी कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला होता.
मानवतावादी दृष्टीकोनातून विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये असे २५ लाख रुपये मंजूर झाले असल्याचे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाचे सह सचिव कैलास बिलोणीकर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना २८ फेब्रुवारी रोजी दिले आहे.
मृत व्यक्तींच्या वारसांची पडताळणी करुन मंजूर रकमेचे वाटप करण्यात यावे ही रक्कम सोलापूर कार्यालयात जमा केली आहे वाटप केल्याबाबतचा अहवाल त्वरीत कळवावा असेही पत्रात म्हटले असल्याचे आ.राऊत यांनी यावेळी सांगितले.