बार्शीचे कलिंगड पश्‍चिम बंगालच्या बाजारपेठेत! एका एकरमध्ये सात लाखांचे उत्पादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

watermelon

शेतकरी बांधवांसमोर आदर्श ठेवल्याने त्यांचे तालुक्‍यात कौतुक होत आहे.

बार्शीचे कलिंगड पश्‍चिम बंगालच्या बाजारपेठेत!

बार्शी (सोलापूर) : निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पाऊस (Rain), मोठ्या प्रमाणात थंडी, कोरोना संसर्गाचे वारंवार सावट, अशा अनेक घटनांशी सामोरे जाऊन उपळाई ठोंगे (ता. बार्शी) येथील शेतकरी प्रमोद अरुण वैद्य यांनी अवघ्या एक एकर शेतीमध्ये अवघ्या 57 दिवसात तब्बल सात लाख रुपयांचे कलिंगड (Watermelon) उत्पादन घेऊन पश्‍चिम बंगाल ( West Bengal) येथील चिलीगुडी येथील बाजारपेठेत विक्री केली आहेत. त्यांनी शेतकरी बांधवांसमोर आदर्श ठेवल्याने त्यांचे तालुक्‍यात कौतुक होत आहे.

हेही वाचा: बाहुबली कलिंगड बांगलादेश नेपाळात; शिक्षक शेतीतील बाहुबली

वैद्य यांनी सुमारे साडेतीन एकर क्षेत्रावर मेलडी जातीच्या कलिंगडाची लागवड केली. त्यापैकी एक एकर क्षेत्रातील कलिंगडाची दोन दिवसांपूर्वी कुर्डुवाडी येथील एस. के. कंपनीच्या माध्यमातून 32 रुपये किलो, अशा विक्रमी दराने विक्री करण्यात आली आहे. एक एकरमध्ये 22 टन उत्पादन झाले. वैद्य कुटुंबाने मागील वर्षीही चार एकर कलिंगडाची लागवड केली होती. मात्र कोविड (Covid) आणि लॉकडाउनमुळे (Lockdown)मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी अवघ्या तीन रुपये किलोने कलिंगडे विक्री केले होते. तर तीन लाख रुपये खर्च केले होते. तरीही साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. अवघा पन्नास हजार रुपये फायदा झाला होता, असे प्रमोद वैद्य यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: आश्चर्यच..! कलिंगड, सिमला मिरची अगदी कलरफुल!

शेती बरोबरच मळणीयंत्र, ट्रॅक्‍टर, भाजीपाला, दूध उत्पादन असे जोडधंदे करीत असून बार्शी शहरातील बाजारपेठेत विक्री करतो. वडील अरुण वैद्य शेतजागा, जमिनीसंबंधी व्यवसाय करतात तर दोघे भाऊ अल्पशिक्षित असूनही सातत्याने प्रयोगशील शेती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील दोन महिन्यांपासून फवारणीसाठी एसटीपी पंप पाठीवरच असल्याचे सांगत त्यांनी घरातील सर्वजण मिळून शेतात रात्रंदिवस राबत आहोत. खत दुकानदारांकडून आणि इतर शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन शेतात नवनवीन प्रयोग सुरु असल्याचे वैद्य यांनी सांगितले.

दुसऱ्या शेतकऱ्याकडे अवघे 25 हजार रुपये सालाने गडी म्हणून राहून पाच वर्षे काम केले. पण नंतर स्वतःची शेती करायचे ठरवले. दिवाळीपूर्वी दोन दिवस अगोदर म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी कलिंगड पिकाची लागवड केली. 57 दिवसांनी एक एकरचा तोडा केला. एक कलिंगड 4 किलो ते 7 किलोपर्यंत भरले. पावसामुळे दोनवेळा जास्त फवारणी करावी लागली. ड्रीप, नवीन रोप व इतर खर्च असा एकरी 70 हजार रुपये खर्च आला आहे.

- दीपक वैद्य, शेतकरी, उपळाई ठोंगे, (ता. बार्शी)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top