
सोलापूर : अन्न गिळताना घसा दुखायचा, काय झालयं हे समजत नव्हते, माझी बहिण आणि भाऊजी डॉक्टर असल्याने त्यांनी तातडीने चाचणी करून घेण्यास सांगितले. माझ्या घशाला कर्करोगाने घेरायला सुरवात केली होती. कर्करोग पसरायच्या आत आम्ही निदान केले, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले. ५ केमो आणि ३५ रेडिएशन घेतले आता मी पूर्णपणे बरा झालोय. आरोग्याच्या बाबतीत सजग रहा, त्रास होताच तपासणी करून घ्या, असा अनुभव सोलापुरातील ६८ वर्षीय बसवेश्वर मंगरुळे यांनी व्यक्त केला.
कर्करोग निवारण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कर्करोगावर केलेली मात याबद्दलचा अनुभव सांगितला. कर्करोग पसरायच्या आत वेळीच निदान करून उपचार घेतल्याने मला शस्त्रक्रियेची गरज पडली नसल्याचेही त्यांनी सांगितले. कुंभारी येथील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये माझ्यावर डॉ. पवार यांच्यासह इतर डॉक्टरांनी उपचार केले. आता माझी तब्बेत ठिक आहे. माझी बहिण डॉ. जगदेवी नागूर व भाऊजी शिवलिंगप्पा नागूर यांनी मला सुरवातीला तातडीने तपासणी करून घेण्यास सांगितल्याने मला कर्करोगाशी लढताना मोठी मदत झाल्याचेही मंगरुळे यांनी सांगितले.
बाभूळगाव (ता. इंदापूर) येथील ६५ वर्षीय किसन देवकर यांनीही कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. कुंभारी येथील रिलायन्स हॉस्पिटलच्या माध्यमातून तब्बल दीड महिना उपचार घेतले. ३० रेडिएशन आणि ४ केमो यामुळे माझा जिभेचा कर्करोग आता पूर्णपणे बरा झाल्याचेही त्यांनी सांगितले. कर्करोग झाला म्हणून घाबरून जाऊ नका, वेळेत निदान, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार उपचार घेतल्यास कर्करोगावर सहज मात करता येईल असा विश्वासही मंगरुळे व देवकर यांनी व्यक्त केला.
आयुष्यमान भारत, जनआरोग्य योजनेचा दिलासा
केंद्र सरकारची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना या माध्यमातून गरिब कुटुंबाच्या आरोग्याची काळजी शासनाच्या वतीने घेतली जात आहे. रिलायन्स हॉस्पिटलसह सोलापूर शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. कर्करोगासह इतर जवळपास सर्वच आजारांवर या योजनांच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. दीपक वाघमारे यांनी केले आहे.
ठळक बाबी
मेडिकल हबच्या दिशेने सोलापूरचे पाऊल
कॅन्सरच्या उपचारासाठी शेजारच्या जिल्ह्यातून, राज्यात येऊ लागले रुग्ण
मुंबई व पुण्याच्या तुलनेत सोलापुरात कमी पैशात उपचार
जनआरोग्य व आयुष्यमान योजनेमुळे रुग्णांवरील आर्थिक ताण कमी
बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचे वाढते प्रमाण
कर्करोगावरील उपचार पध्दतीत सध्या रेडिएशन महत्वाची भूमिका बजावत आहे. रेडिएशनचा योग्य वापर केल्यास शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे रुग्णांना कमीत कमी त्रास, वेळेची बचत होत असल्याने ७० टक्के रुग्णांसाठी रेडिएशनचा उपयोग केला जातो. वृध्द रुग्ण, इतर आजार असलेले रुग्ण यांच्यासाठी रेडिएशनद्वारे चांगल्या पध्दतीने उपचार केले जातात.
- डॉ. दिनेश पवार, रिलायन्स हॉस्पिटल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.