esakal | "स्मार्ट सिटी' खुलवु लागली सोलापूरचे सौंदर्य, सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी "कॉफी विथ सकाळ'मध्ये मांडली रुपरेषा 
sakal

बोलून बातमी शोधा

logo

आकडे बोलतात 
स्मार्ट सिटी अंतर्गत प्राप्त निधी 
केंद्र सरकार हिस्सा : 194 कोटी रुपये 
राज्य शासन हिस्सा : 98 कोटी रुपये 
स्थानिक स्वराज्य संस्था हिस्सा : 70 कोटी रुपये 
 एकूण प्राप्त निधी : 362 कोटी रुपये 
 खर्च निधी : 179 कोटी 68 लाख रुपये 

"स्मार्ट सिटी' खुलवु लागली सोलापूरचे सौंदर्य, सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी "कॉफी विथ सकाळ'मध्ये मांडली रुपरेषा 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : शहराला समृध्द वारसा आहे. सोलापूरच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजनेअंतर्गत 2016 मध्ये सोलापूर शहराचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश झाला. सोलापूरच्या विकासासाठी सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीची स्थापना झाली. स्वच्छ, कार्यक्षम आणि विकसनशील या त्रिसूत्रीनूसार स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. सोलापूरच्या सौंदर्यात अधिकची भर टाकण्यासाठी "स्मार्ट सिटी' मोलाचे योगदान देत असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी कॉफी विथ सकाळमध्ये दिली. 

ई-टॉयलेटची उभारणी, घंटा गाडी खरेदी, डस्टबिन खरेदी, ट्रान्सफार्मर स्टेशन निर्मिती, ट्रान्सफार्मर स्टेशन मशनरी खरेदी, नागरिकांमध्ये जनजागृती, रंगभवन चौकात पब्लिक प्लाझाची निर्मिती, पर्यायी रस्त्यांचे पुर्नडांबरीकरण, लाईट व्यवस्था, थर्मोप्लास्टिक पेंट मारणे, हुतात्मा बागेचे सुशोभीकरण, पासपोर्ट ऑफिस लगत ऍडव्हेंचर पार्क तयार करणे, ओपन जिम, होम मैदानाची सुधारणा, एबीडी एरियामध्ये दैनिक पाणीपुरवठ्यासाठी पायलट प्रोजेक्‍ट, इंफॉर्मेशन की-ऑस्कची उभारणी, महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट क्‍लासरूम करण्यासाठी आवश्‍यक ती कामे अशी एकूण 15 कामे आतापर्यंत पूर्ण झाली असल्याची माहितीही ढेंगळे-पाटील यांनी दिली. 

स्मार्ट पायलेट रोड, प्राधान्य रस्ते, एलईडी पथदिवे बसविणे, रूफ टॉप सोलर बसविणे, सिद्धेश्वर तलाव परिसर विकसित करणे, लक्ष्मी मार्केटचे नुतनीकरण, उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनी, एबीडी एरियात पाणी पुरवठा व मलनिस्सारण प्रक्रियेमध्ये सुधारणा करणे, स्ट्रिट बझार, सिद्धेश्वर तलावाचे पुनर्जीवन करणे, इंदिरा गांधी स्टेडियमचे नूतनीकरण ही कामे सध्या हाती घेण्यात आली आहेत. लवकरच ही कामे पूर्णत्वास नेले जातील अशी माहितीही ढेंगळे पाटील यांनी दिली. 

पथदिव्यांवर आले एलईडी 
शहरातील सुमारे 40 हजार पथदिव्यांचे रुपांतर एलईडीमध्ये करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी दिवे उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी 5 हजार विद्युत खांब बसविण्यात येणार आहेत. शहरात सध्या 43 हजार एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. हद्दवाढ भागात 12 हजार विद्युत खांब बसविण्यात आले आहेत. 

शासकीय इमारतीवर रूफ टॉप सोलर 
महापालिका, कौन्सिल हॉल, हुतात्मा स्मृती मंदिर, जिल्हा न्यायालय, सोरेगाव येथील पाणीपुरवठा केंद्राच्या छतावर रुफ टॉप सोलरचे काम हाती घेण्यात आले आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, नेहरू सायन्स सेंटर, मार्कंडेय जलतरण तलाव, महापालिका आयुक्तांचे निवासस्थान या ठिकाणी सोलर पॅनेल बसविण्यात आले आहे. पुढील टप्प्यात सिव्हील हॉस्पिटल, नियोजन भवन, वैद्यकिय महाविद्यालयाच्या छतावर देखील रुफ टॉप सोलर बसविण्यात येणार आहे. 
 
स्टेडियमचे नूतनीकरण 
इंदिरा गांधी स्टेडियम सर्व खेळांसाठी विकसित केले जात आहे. क्रिकेट, खो-खो, बॅडमिंटन, कबड्डी तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा या ठिकाणी होत आहे. क्रिकेटसाठी 11 पिचेस, सरावासाठी सात पिचेससह आऊट फिल्डची कामे प्रगतीपथावर आहेत. 

loading image