esakal | पार्थ पवारांबाबत अजित पवारांच्या स्पष्टतेनंतर राष्ट्रवादीची उमेदवारी भगीरथ भालके यांनाच मिळण्याची शक्‍यता ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat _Bhalke

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे या रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना संधी द्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांतून होत आहे. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सरकोली दौऱ्यादरम्यान त्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त न केल्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. 

पार्थ पवारांबाबत अजित पवारांच्या स्पष्टतेनंतर राष्ट्रवादीची उमेदवारी भगीरथ भालके यांनाच मिळण्याची शक्‍यता ! 

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार असल्याची स्पष्टता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी आमदार भारत भालके यांच्या कुटुंबात जाणार असल्याचे स्पष्ट झाले. 

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे या रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना संधी द्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांतून होत आहे. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सरकोली दौऱ्यादरम्यान त्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त न केल्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना संधी द्यावी, अशी मागणी पंढरपुरातून अमरजित पाटील यांनी केली होती. त्यांच्या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. 

याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, अशी कोणतीही चर्चा पक्ष पातळीवर झाली नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सोशल मीडियामध्ये सर्वच पक्षांच्या समर्थकांमध्ये निवडणुकीबाबत वेगवेगळी मतमतांतरे व्यक्त होऊ लागली. काहींनी उपरा उमेदवार या मतदारसंघात टिकणार का, यावर चर्चा करत 2009 ची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता देखील वर्तवली होती. परंतु या सर्व शक्‍यतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णविराम दिल्यामुळे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागी राष्ट्रवादीकडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. 

दरम्यान, काल (सोमवारी) खासदार संभाजीराजे यांनी आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे यांनीही, पोटनिवडणूक बिनविरोध होत असेल तर स्वागत आहे; परंतु निवडणूक लागणार असेल तर आपणही इच्छुक असल्याचा दावा यापूर्वीच केला आहे. त्यामुळे ही जागा बिनविरोध होणार? की निवडणूक लागणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल