'भिमा'चा सभासद भविष्यात इंधन निर्माता होईल - खा. धनंजय महाडिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhima Sugar Factory

सन 2021/22 या गाळप हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला दिपवाळीच्या सणासाठी प्रति टन शंभर रुपये तर चालू सन 2022/23 या गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पहिली उचल 2 हजार 100 रुपये देण्यात येणार.

'भिमा'चा सभासद भविष्यात इंधन निर्माता होईल - खा. धनंजय महाडिक

मोहोळ - सन 2021/22 या गाळप हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला दिपवाळीच्या सणासाठी प्रति टन शंभर रुपये तर चालू सन 2022/23 या गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पहिली उचल 2 हजार 100 रुपये देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ऊस इतर कारखान्यास पाठविण्याची गडबड करू नये, इतर कारखान्याचा दर व वजन तपासून पाहा. अन्यथा गडबड खूप महागात बसेल, असे प्रतिपादन भीमा कारखान्याचे अध्यक्ष खा. धनंजय महाडिक यांनी केले. हे निर्णय जाहीर करताच शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.

टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 43 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष खा. महाडिक व कारखान्याचे मच्छिंद्र शंकर टेकळे, अंबादास धोंडीबा भोसले, हरिभाऊ दामू चवरे, पंडित आनंदा बाबर व दिलीप पुरुषोत्तम चव्हाण या पाच ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी खा. महाडिक बोलत होते.

महाडिक पुढे म्हणाले, गेल्या गळीत हंगामात मानव निर्मित व काही नैसर्गिक संकटामुळे कारखान्याला अडचण निर्माण झाली होती. मात्र यावर्षी तसे होणार नाही. ज्या दिवशी कारखाना बंद होईल त्याच दिवशी शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतील. सध्या इथेनॉलला चांगले दिवस आहेत. सध्या कारखान्याचा सभासद वीज निर्मिती करीत आहे, पण तो भविष्यात इथेनॉलच्या माध्यमातून इंधन निर्माता होणार आहे, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मदत करण्यासाठी सकारात्मक असल्याचेही खा. महाडिक यांनी सांगितले. इथेनॉल व वीज निर्मितीमुळे ज्यादा दर देणे शक्य होणार आहे.

गेल्या गाळप हंगामातील कारखान्याची एफआरपी 2 हजार 60 रुपये आहे. त्यावेळी 2 हजार 100 रुपये दिले, तर त्याच गळीत हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाला प्रति टन शंभर रुपयाचा हप्ता जाहीर केला आहे. त्यापैकी पन्नास रुपये दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून उर्वरित नंतर देण्यात येणार आहेत.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, युवा नेते विश्वराज महाडिक, पवन महाडिक, विजय महाडिक, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, शंकर वाघमारे, सुरेश सावंत, विक्रम डोंगरे, संतोष खुळे, सुनील चव्हाण, संग्राम चव्हाण, छगन पवार, दिगंबर माळी, तात्या नागटिळक, आनंदा चव्हाण, हरिभाऊ काकडे, गंगाधर चवरे, मनोहर पवार, पांडुरंग ताठे, भारत पाटील, राजू बाबर, झाकीर मुलाणी, बंडू शेख, संचालक राजेंद्र टेकळे, दादासाहेब शिंदे, तुषार चव्हाण, दिलीप रणदिवे, श्री पुदे, भीमराव वसेकर, भाऊसाहेब जगताप, संतोष सुळे, धनंजय देशमुख, यांच्यासह सर्व खाते प्रमुख त्यांचे सर्व सहकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार पांडुरंग ताठे यांनी मानले.