फुलारेंनी मांडले, पाटलांनी पेटविले, चंदनशिवेंनी तडीस नेले ! भाजप-कॉंग्रेसच्या अंतर्गत खेळ्या महापालिकेच्या सभेत चव्हाट्यावर 

SMC_Sakal
SMC_Sakal

सोलापूर : अंदाजपत्रकाच्या मंजुरीसाठी बोललेली महापालिकेची सर्वसाधारण सभा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील निधी वाटपावरून गाजली. निधी वाटपाचा मुद्दा नगरसेविका श्रीदेवी फुलारेंनी मांडला. त्यांचा मुद्दा अधिक प्रभावी करण्यासाठी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटलांनी फोडणी दिली. वंचितचे नगरसेवक आनंद चंदनशिवेंनी शेवटपर्यंत हा प्रश्‍न उचलून धरल्याने सत्ताधारी भाजपवर सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढावली. 

महापालिकेतील भाजप आणि कॉंग्रेसमधील अंतर्गत खेळ्या, गटबाजी महापालिकेच्या सभागृहात चव्हाट्यावर आली. निधी वाटपाच्या मुद्‌द्‌यावरून सुरवातीला एकट्या पडलेल्या फुलारे यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे व राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुनीता रोटे धावून आल्या. कॉंग्रेसचे नगरसेवक मात्र त्या वेळी बघ्याच्या भूमिकेत होते. भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील नवनवीन मुद्दे उपस्थित करून फुलारे यांची बाजू भक्कम करत होते. फुलारे यांचे नाव वगळणारे कोण?, आयुक्त साहेब तुम्ही खुलासा करा, अशी मागणी करून नगरसेवक पाटील यांनी नगरसेविका फुलारे यांचा मुद्दा शेवटपर्यंत तेवत ठेवला. 

एमआयएम, राष्ट्रवादी, माकपच्या नगरसेवकांनी महापौरांच्या समोर ठिय्या मांडला. आनंद चंदनशिवे यांनी आक्रमक भूमिका घेत निधीच्या यादीतून फुलारेंना वगळ्यात कॉंग्रेस - राष्ट्रवादीची भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित केला. प्रकरण आपल्या अंगलट येऊ शकते याची जाणीव झाल्यानंतर सभागृहात शांत बसलेले कॉंग्रेसचे काही नगरसेवक व गटनेते चेतन नरोटे पुढे आले. पोकळ घोषणा करू नका, आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते नरोटे यांनी केली. नगरसेवकांनी मांडलेला ठिय्या पाहून महापौर यन्नम सभागृह सोडून निघून गेल्या. 

फुलारे म्हणाल्या, ऐकून घ्यायला मी काय बाळ आहे का? 
तुम्हाला सभागृहनेता पदावर काम करणे जमत नसेल तर तुम्ही घरी बसा, अशा शेलक्‍या शब्दात नगरसेविका फुलारे यांनी सभागृहनेते करली यांना सुनावले. तुम्ही यादी बदलत नसाल तर बघाच मी काय करते ते, असा दमच नगरसेविका फुलारे यांनी सभागृहात दिला. तुम्ही माझे ऐकून घ्या, असे सांगण्याचा प्रयत्न महापौर यन्नम यांनी केला. तुमचे म्हणणे ऐकायला मी काय लहान बाळ आहे का? असे प्रत्युत्तर देत नगरसेविका फुलारे यांनी आपला राग व्यक्त केला. 

सुरेश पाटलांच्या डोक्‍यात काय? 
नगरसेविका फुलारे यांचा मुद्दा शेवटपर्यंत तेवत ठेवण्यात भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याची भूमिका नगरसेवक पाटील यांनी का घेतली?, त्यांच्या डोक्‍यात सध्या काय आहे? अन्य कोणत्या विषयासाठी त्यांनी हा मुद्दा पेटविला का? याचे कोडे मात्र कायमच राहिले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com