
भाजपला मनसेची गरज नाही : आठवले
सोलापूर: दोन समाजात तेढ निर्माण करणारी राज ठाकरे यांची भूमिका चुकीची आहे. त्यांच्या झेंड्यात पूर्वी सर्व रंग होते. आज त्यांनी केवळ भगवा रंग ठेवला आहे. भगवा रंग हा वाद लावणारा रंग नाही, तो शांततेचे प्रतीक आहे. भाजपला त्यांची गरज नाही, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. (Ramdas Athawale on MNS)
ज्येष्ठ संशोधक चंद्रकांत पांडव यांच्या सत्काराच्या निमित्ताने सोलापूर येथे आले असता पत्रकार परिषदेत श्री. आठवले बोलत होते. ते पुढे म्हणाले, हनुमान चालिसा म्हणण्याला विरोध नाही मात्र ती मंदिरात म्हंटली पाहिजे. दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळासमोर म्हणण्याची गरज नाही. मस्जिदच्या भोंग्यांचा त्रास होत असेल तर त्याचा आवाज कमी करण्याचा विचार करता येईल. सामंजस्यातून भोंगे काढता येतील. पोलिसांनी बळजबरीने ते काढू नयेत. सर्वच धर्मात परंपरा आहेत. भीम जयंतीचे कार्यक्रम, मिरवणुका रात्री उशिरापर्यंत होतात. केवळ विशिष्ट धर्माच्याच भोंग्यावर कारवाई करता येणार नाही. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदा मंदिरांचे भोंगे काढले नंतर मस्जिदचे भोंगे हटवले आहेत. राज ठाकरे यांनी वाद निर्माण करू नयेत. त्यांनी असे वाद निर्माण केले तरी भाजप मनसेला बरोबर घेणार नाही. यावेळी के. डी. कांबळे, राजा सरवदे, अतुल नागटिळक, पवन थोरात आदी उपस्थित होते.
राज्यातील सरकार नक्की कोसळेल
राज्यातील महाविकास आघाडी सरकार नक्कीच कोसळणार आहे. या सरकारमधील घटक पक्ष असलेला काँग्रेस पक्ष सरकारवर नाराज आहे. काँग्रेसच्या आमदारांना निधी मिळत नाही. काँग्रेसने अपमान सहन करून सरकारमध्ये राहू नये. काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यास सरकार नक्की पडेल. त्यानंतर भाजप नक्की सरकार स्थापन करेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करावा
पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्यासाठी राज्य सरकारने आपला व्हॅट कमी करावा, यामुळे महागाईदेखील कमी होईल. राज्य सरकार प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशातील कोट्यवधी जनतेला जनधन खाते मिळाले. उज्ज्वला योजनेतून गॅस मिळाला. प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रत्येकाला घर मिळाले. म्हणूनच पाच राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले. २०२४ च्या निवडणुकीत निश्चितच यश मिळेल.
आठवले म्हणाले...
मी केंद्रात असेपर्यंत संविधानाला धक्का लागणार नााही.
भीमा - कोरेगावप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होणे आवश्यक
भूमिहिनांना प्रत्येकी पाच एकर जमीन द्या
मराठा समाजातील सर्वसामान्यांना आरक्षण द्या
ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण द्या
शरद पवार जातीयवादी नाहीत; मात्र अमोल मिटकरी जातीयवादी
मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता येणार
आम्ही सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही
२०१९ पूर्वीच्या सर्व झोपड्या नियमित करा
Web Title: Bjp Does Need Mns Athavale
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..