Start up : रिवायंडिंग व्यावसायिक ते उद्योजकतेचा यशस्वी प्रवास

जयसिंग चंदनशिवेंच्या ऑईल मिलमधून आठजणांना रोजगार
Start up : रिवायंडिंग व्यावसायिक ते उद्योजकतेचा यशस्वी प्रवास
sakal

सोलापूर : नोकरी केली की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा अन्‌ व्यवसायातूनच उद्योग उभारण्याची जिद्द मनाशी धरून बाकळे नगरातील जयसिंग चंदनशिवे यांनी स्वतःची ऑइल मिल सुरू केली आहे. त्यांनी त्यांच्या या व्यवसाय व उद्योगातून आठजणांना रोजगार दिला आहे.

जयसिंग चंदनशिवे यांनी शिक्षण सोडल्यावर आधी मोटार रिवायंडिंगच्या दुकानात काम सुरू केले. सुरवातीला काम सुरू केल्यानंतर पगार वाढेना म्हणून ते चिंतेत सापडले होते. नंतर एक खोके टाकून स्वतःच रिवायंडिंगची कामे सुरू केली. पण खोके अतिक्रमण विरोधी पथकाने उचलून नेले. तेवढ्यात महापालिकेच्या निवडणुका लागल्याने ते एका मित्राच्या प्रचारात उतरले. प्रचार संपल्यानंतर मित्राच्या विरोधकाने मोटार दुरुस्तीसाठी बोलावून विचारणा केली.

त्यांनी श्री. चंदनशिवे यांना थेट नामवंत इलेक्ट्रिक मोटार कंपनीत नोकरीला लावले. साहेबांचे बोलणे पटेना म्हणून एक दिवस ते सरळ नोकरी सोडून बाहेर पडले. मित्रांना नोकरी सोडली म्हणून चहा पाजला. तेव्हा मोटार रिवायंडिंग लाइनमधील एकाने तत्काळ दुकान भाड्याने देऊन टाकले. लगेच मशिनरी साहित्य विक्रीचे दुकान सुरू झाले. पण दुकान सुरू केले तर आता स्वतःचाच उद्योग उभारायचा, हा त्यांचा निर्धार होता. त्यांच्या या निर्धाराला वय कधीच आडवे आले नाही.

बाजारात राहून नवे काही तरी करत राहावे, अशी चंदनशिवे यांची धडपड होती. कोरोना काळात चांगले अन्न खायला पाहिजे, याबद्दल लोकांत चर्चा सुरू होती. मग त्यांनी लाकडी घाण्याचा तेल कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात भेट देऊन माहिती घेतली. उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कर्ज मंजूर केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांचा उद्योग सुरू झाला. त्यांचा हा उद्योग त्यांचा मुलगा कुणाल पाहात आहे. नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या खाद्यतेलाचे उत्पादन ते घेतात. उद्योग निर्मिती झाल्यानंतर बाजारपेठेत निर्माण झालेले संबंध त्यांना शांत बसू देत नव्हते. त्यांनी आता चहाच्या व्यवसायात आलेली ब्रॅंडिंग पाहून स्वतःचं ब्रॅंडेड चहा सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न करीत आहेत.

अगदी कमी वयापासून केलेल्या कष्टामुळे सतत बाजारातील व्यापारी व विक्रेत्यांची साथ मिळत गेली. व्यापार करणारा माणूस उद्योग देखील सहज करू शकतो, हा आत्मविश्वास बाजारपेठेच्या अनुभवातून मिळत गेला. त्यातून सातत्याने नवे काही करण्याचा ध्यास बाळगत व्यवसाय व उद्योग उभारले.

- जयसिंग चंदनशिवे, संचालक, चंदन ऑइल इंडस्ट्रीज, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com