Solapur News : बाळे येथे स्मार्ट सिटीच्या केबल डक्टला आग ; तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात

सलग दुसऱ्या दिवशी बाळे येथील स्मार्ट सिटी प्रकल्पातील केबल डक्ट व कचऱ्याला प्रचंड मोठी आग लागून नुकसान झाले. काल तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोलापुरात लागलेली ही दुसरी मोठी आगीची घटना आहे.
Solapur News
Solapur Newssakal

सोलापूर : सलग दुसऱ्या दिवशी बाळे येथील स्मार्ट सिटी प्रकल्पातील केबल डक्ट व कचऱ्याला प्रचंड मोठी आग लागून नुकसान झाले. काल तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोलापुरात लागलेली ही दुसरी मोठी आगीची घटना आहे. तर गत पंधरा दिवसातील ही तिसरी आगीची घटना आहे. या आगीमुळे आसपासच्या दोन किलोमीटर परिसरात सर्वत्र काजळी पसरली होती.

शुक्रवारी तुळजापूर रोडवरील महापालिकेच्या ५४ एकर परिसरातील कचरा प्रकल्पाच्या २० एकर परिसरात अचानक आग लागली होती. वाढत्या तापमानामुळे ही आग लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी बाळे येथील जैव वैद्यकीय कचरा प्रकल्पाशेजारी असलेल्या मोकळ्या जागेतील केबल डक्टला आग लागली. कोविड काळात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाशेजारी अंडरग्राउंड वायरिंग करण्यासाठी आवश्यक केबल डक्ट टाकण्यात आले होते.

वाळलेल्या गवतामुळे कचऱ्याला लागलेल्या आगीने काही क्षणातच वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण करत या केबल डक्टला देखील विळखा घातला. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी लागलेल्या आगीचे लोट इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर होते की ते शहरातील नवी वेस पोलिस चौकी येथून देखील सहज पाहायला मिळत होते यावरून आग लागण्याचे प्रमाण किती प्रचंड होते हे लक्षात येते. मात्र या आगीत नेमके किती नुकसान झाले हे समजू शकले नाही.

आग लागण्याची व वाढण्याची कारणे

कचऱ्यात असलेला मिथेन वायू आग लागण्याचे मुख्य कारण

  • साधारणतः ४२ ते ४३ अंश सेल्सिअस तापमानावर मिथेन वायू पेट घेतो

  • प्रकल्प परिसरात वाळलेल्या गवताचे प्रमाण जास्त

  • सलग दुसऱ्या दिवशी आग लागल्याने अग्निशमन दलाची दुहेरी धावपळ

  • केबल पाईप झाडाखाली सावलीच्या ठिकाणी टाकायला हवे होते

ठळक बाबी

  • आगीची माहिती मिळताच उपायुक्त आशिष लोकरे घटनास्थळी हजर

  • प्रचंड धग असताना उपायुक्त लोकरे यांनी चौफेर फिरून घेतला आगीचा अंदाज

  • फोनवरून तातडीने फोमगाड्या पाठवण्याचे दिले आदेश

  • सुमारे १२ वाजता लागली आग

  • तब्बल ६ तास २५ टँकर वापरून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न

  • आग आटोक्यात आणण्यासाठी एनटीपीसी, इंडियन ऑइल, लोकमंगल कारखाना यांचेही टँकर मागवले

आग आटोक्यात येईपर्यंत उपायुक्त घटनास्थळी

महापालिका उपायुक्त आशिष लोकरे व माजी नगरसेवक गणेश पुजारी, अग्निशमन दल प्रमुख केदार आवटे यांचा प्रत्यक्ष घटनास्थळी मदत कार्यात सहभाग होता. आगीचे रौद्ररूप उपायुक्त आशिष लोकरे यांच्या चेहऱ्यावरचा ताण क्षणाक्षणाला वाढवत होते. जवळपास १७ गाड्या फवारणी होईपर्यंत तिघेही घटनास्थळी जातीने उपस्थित होते.

नागरिकांची नाराजी

जैव वैद्यकीय कचरा प्रकल्पाच्या चिमणीची उंची कमी आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरांवर अगदी जेवणाच्या ताटातही काजळी पडत होती. प्रकल्पाच्या चिमणीची उंची वाढवण्याबाबत स्थानिक रहिवाशांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे विनंती केली होती. तसेच या चिमणीतून ठिणग्या बाहेर पडत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com