ब्रेकींग! कोरोना वाढीच्या शोधासाठी केंद्र सरकारची राज्यात पथके; बीड, नगर, जळगाव, परभणी, नांदेड व सांगलीत 'सिरो-सर्व्हे'...

Central government squads in the state to search for corona virus
Central government squads in the state to search for corona virus

सोलापूर : देशातील कोविड 19 (कोरोना) या विषाणूच्या प्रसाराची व्याप्ती समजण्यासाठी 21 राज्यांमधील 69 जिल्ह्यांमध्ये सिरो-सर्व्हे केला जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील बीड, नगर, जळगाव, परभणी, नांदेड, सांगली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व्हेअंतर्गत या जिल्ह्यांमधील रॅन्डम पद्धतीने दहा समूहांची निवड केली जाणार असून त्यानंतर प्रत्येक समूहातील 40 जणांची (एकूण 400) रक्ततपासणी केली जाणार आहे. या तपासणीद्वारे त्या व्यक्तीच्या रक्त द्रवातील प्रतिपिंडाचा (एन्टीबॉडी) शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय रोग निवारण केंद्र (नवी दिल्ली), राष्ट्रीय साथरोग शास्त्र संस्था (चेन्नई) व राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र (चेन्नई) यांची मदत घेतली जाणार आहे.
राज्यातील रुग्ण संख्येने आता 35 हजारांचा टप्पा अल्पावधीतच ओलांडला आहे. 1 मे च्या तुलनेत 18 मेपर्यंत राज्यात 23 हजार 552 रुग्ण वाढले आहेत. मागील 18 दिवसांपासून सरासरी सात ते आठ हजार संशयित व्यक्तींची कोरोना टेस्ट केली जात असून त्यासाठी दररोज तब्‍बल तीन कोटी 23 लाख रुपयांचा खर्च होत आहे. तर दुसरीकडे राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही आत्तापर्यंत कोरोना टेस्टसाठी राज्य सरकारला 127 कोटी रुपयांचा खर्च करावा लागला आहे. तत्पूर्वी, केंद्र सरकारच्या माध्यमातून कोरोना या विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी प्रतिबंधित परिसरांमध्ये 'क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना' राबविली जात आहे. तरीही खर्च कमी झाला नसून आता हा खर्च कमी करणे आणि राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने केंद्र सरकारने देशातील 69 जिल्ह्यांमध्ये सिरो-सर्व्हे करण्याचे नियोजन केले आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या 'इलायझा' या पद्धतीचा वापर करून संबंधित समूहातील व्यक्तीच्या रक्त नमुन्याची चाचणी घेतली जाणार आहे. प्राप्त माहितीवर संशोधन करून कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष नियोजन केले जाणार आहे.

रुग्ण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्येच सर्व्हे कशासाठी?
राज्यातील रुग्ण संख्या दररोज दीड ते दोन हजाराच्या पटीत दररोज वाढू लागली आहे. आता पावसाळा सुरू होणार असल्याने या विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे काही दिवसात पूर्ण केला जाणार आहे. काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, मीरा- भाईंदर, वसई- विरार, मालेगाव, पुणे, सोलापूर, नागपूर, अकोला व औरंगाबाद या शहर- जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आत्तापर्यंत मुंबईत 21 हजार 335, ठाण्यात दोन हजार 34, नवी मुंबईर एक हजार 382, कल्याण-डोंबिवलीत 533, मीरा- भाईंदरमध्ये 304, वसई- विरारमध्ये 372, मालेगावमध्ये 677, पुणे जिल्ह्यात तीन 911, सोलापूर शहर- जिल्ह्यात ४४३, नागपूर शहरात 373, औरंगाबाद जिल्ह्यात 974  इतके रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या प्रसाराची व्याप्ती या शहर जिल्ह्यातूनच शोधण्याची गरज आहे. मात्र, केंद्र सरकारने बीड जिल्ह्यात तीन, नगर जिल्ह्यात 84, जळगावमध्ये 292, परभणीत सात, नांदेडमध्ये 78 आणि सांगलीमध्ये 53 रुग्ण सापडले असतानाही या जिल्ह्यांची सर्व्हेसाठी निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com