esakal | चैत्री एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात द्राक्षांची नयनरम्य सजावट ! भक्तांविना सोहळा साजरा

बोलून बातमी शोधा

Chaitri Ekadashi
चैत्री एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात द्राक्षांची नयनरम्य सजावट ! भक्तांविना सोहळा साजरा
sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या सावटामुळे आज चैत्री एकादशीचा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात सातशे किलो द्राक्ष वापरून आकर्षक सजावट करण्यात आली होती. यात्रेसाठी परगावाहून येणाऱ्या भाविकांना पंढरपुरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिस तैनात करण्यात आले असल्याने यात्रेत फुलून जाणाऱ्या या परिसरात आज अक्षरशः शुकशुकाट होता.

कोरोनाच्या सावटामुळे चैत्री यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कोणीही भाविकांनी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते. वारकरी भाविक- भक्तांनी देखील सद्य:स्थितीचा विचार करून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. परगावाहून कोणीही भाविक आज पंढरपूरला आलेले नाहीत.

हेही वाचा: अकलूजला दररोज 250 ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज ! पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न

पंढरपूर शहराच्या हद्दीवर तसेच मंदिर परिसर, चंद्रभागा नदीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर जागोजागी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात ऐन यात्रेत शुकशुकाट पहायला मिळत आहे.

दरम्यान, आज मोजक्‍या वारकरी मंडळींच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणा करून प्रातिनिधिक स्वरूपात एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला. श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विधिवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

पंढरपूर तालुक्‍यातील लक्ष्मी टाकळी येथील श्री विठ्ठलभक्त संजय टिकोरे यांनी सातशे किलो द्राक्षे मंदिरात सजावटीसाठी दिली होती. या द्राक्षांची मंदिर समितीच्या कर्चाऱ्यांनी मंदिरात आकर्षक सजावट केली होती.