esakal | आम्हीपण पाटील आहोत! चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

Chadrakant Patil

आम्हीपण पाटील आहोत! चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर पलटवार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप नेत्यांची फटकेबाजी सुरूच आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, अशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली होती. त्यावर आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या कालच्या वक्तव्याचा आज समाचार घेत "महाराष्ट्रात बेबंदशाही नाही, आम्हीपण पाटील आहोत', असा टोला लगावला.

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आज पंढरपुरात आले आहेत. प्रा. बी. पी. रोंगे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

या वेळी श्री. पाटील म्हणाले की, आम्हाला पण बोलता येतं. अजित पवारांची अनेक प्रकरणांची अजून चौकशी व्हायची आहे. पराभवाच्या भीतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यांना पराभव समोर दिसू लागल्यानेच अजित पवार अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत.

पवारांनी इतका अहंकार बाळगू नये. हम किसी को टोकेंगे तो छोडेंगे भी नही, असे म्हणत, सरकार कधी बदलायचं ते आम्ही बघू, असा सूचक इशाराही त्यांनी आज येथे दिला.

दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा आमदार निवडून द्या, या सरकारचा मी करेक्‍ट कार्यक्रम करतो, असा सूचक इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच्या सभेत खिल्ली उडवली. सरकार पाडणं म्हणजे काय येरा गबाळ्याचं काम नाही. सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, असा पलटवार केला. तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधी पक्षनेतेपदा विषयी साशंकता व्यक्त केली होती.

त्यावर आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर पलटवार करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

या वेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार गोपीचंद पडळकर, नगरसेवक अनुप शहा, बी. पी. रोंगे आदी उपस्थित होते.

संपादन : श्रीनिवास दुध्याल

बातमीदार : भारत नागणे