सोलापूर : परवान्याविना रखडले चार्जिंग स्टेशन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivai Bus

सोलापूर : परवान्याविना रखडले चार्जिंग स्टेशन!

सोलापूर - एसटी महामंडळाने १ जून या वर्धापन दिनापासून इलेक्ट्रिक बस (ई-बस) राज्यातील विविध विभागांमध्ये चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यात सोलापूर- पुणे मार्गावर देखील ई-बस धावणार असून, पुणे येथील स्वारगेट डेपोमध्ये चार्जिंग स्टेशनची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र. सोलापुरातील चार्जिंग स्टेशन महापालिका व महावितरणच्या परवानगीविना रखडले आहे. त्यामुळे ई-बस सुरु होण्यास विलंब लागू शकतो.

मागील तीन महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये उच्चांकी वाढ होत आहे. त्यामुळे प्रवास देखील महाग झाला आहे. याला पर्याय म्हणून एसटी महामंडळाने १ जून वर्धापन दिनापासून राज्यातील विविध विभागांमध्ये ई-बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यात सोलापूर- पुणे व सोलापूर- विजयपूर मार्गावर देखील ई-बस धावणार आहे. पुणे विभागातील स्वारगेट येथे चार्जिंग स्टेशन पूर्ण झाले आहे. सोलापूर आगारात मात्र महावितरण आणि महापालिका प्रशासनाकडून परवानगी मिळविण्यात वेळ जात आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशनचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने सोलापूर- पुणे मार्गावर ई-बसचा मुहूर्त लांबणीवरच पडण्याची शक्यता दिसून येत आहे.

दिवसेंदिवस खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. त्यात मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात आणखीन मोठी भर पडली आहे. त्याचबरोबर मागील सहा महिन्यांत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाचे चाक आणखीन खोलात रुतले आहे. त्यात इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे व उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने महामंडळासमोर यक्ष प्रश्‍न उभा आहे. त्यामुळे महामंडळाने इंधनावर होणारा खर्च पाहता ई-बस सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इंधनावर दिवसाचा खर्च कमी होणार असून, प्रदूषणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे.

सोलापूरला पहिल्या टप्प्यात १०० बस

एसटी महामंडळाने ई-बस चालविण्यासाठी राज्यातील सर्व विभागीय कार्यालयांकडून माहिती मागविली होती. यात सोलापूर विभागाने पहिल्या टप्प्यात १०० बस मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. ई-बस एकदा चार्जिंग केल्यानंतर ३०० किलोमीटर धावते. त्यामुळे सोलापूर- पुणे आणि सोलापूर- विजयपूर मार्गावर ई-बस सोडण्याचे महामंडळाने नियोजन केले आहे.

ठळक बाबी....

- एकदा चार्जिंग केल्यानंतर ३०० किलोमीटर प्रवास

- सोलापुरात चार्जिंग स्टेशनचे काम अपूर्ण

- सोलापूर-पुणे आणि सोलापूर-विजयपूर मार्गावर बस सोडण्याचे नियोजन

- शिवशाही बसऐवजी धावणार इलेक्ट्रिक शिवाई

Web Title: Charging Station Stuck Without A License In Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top