esakal | जिल्ह्यातील 74 बालविवाह रोखले ! कोरोना काळात का वाढले बालविवाह?
sakal

बोलून बातमी शोधा

Child Marriage

जिल्ह्यातील 74 बालविवाह रोखले ! कोरोना काळात का वाढले बालविवाह?

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जालन्यावरून मजुरीसाठी वेळापुरात आलेल्या पालकांनी 16 वर्षाच्या मुलीचा वेळापूरजवळील एका गावातील मुलासोबत विवाह जमविला. गुरुवारी (ता. 22) विवाह करण्याचा मुहूर्त निवडला. तत्पूर्वी, बार्शीतही असाच विवाह होणार असल्याची माहिती बाल कल्याण समितीला मिळाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही कुटुंबातील सदस्यांना ताब्यात घेतले आणि तो विवाह थांबविला.

कोरोना काळात मागील 14 महिन्यांत बालविवाहाचे प्रमाण खूपच वाढले आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यातील तब्बल 74 बालविवाह जिल्हा बालकल्याण समितीने रोखले आहेत. त्यात काही मुलींचे वय 18 पूर्ण होण्यासाठी दोन दिवस, एक महिना शिल्लक होते, अशाही बालविवाहाचा समावेश आहे. तर सर्वाधिक बालविवाह 16-17 वर्षांच्या मुलींचाच होऊ लागल्याचेही समोर आले आहे.

हेही वाचा: खबरदारी घेऊन कोरोनावर "अशी' मात करता येते ! सांगताहेत डॉ. प्रदीप आवटे

कोरोना काळात अनेकांनी उदरनिर्वाहासाठी स्थलांतर केले आहे. कुटुंबासमोरील उदरनिर्वाहाचा प्रश्‍न, शाळा- महाविद्यालये बंद असल्याने घरात एकटीच असलेल्या मुलीची चिंता, लॉकडाउन काळात विवाहाच्या खर्चात होणारी बचत, मुलीसाठी आलेले चांगले स्थळ, अशा विविध कारणांमुळे पालक मुलीचे वय 18 होण्यापूर्वीच विवाह लावून देत आहेत. विवाहानंतर मुलगी सासरी तर सुखी राहील, या आशेतून बालविवाह वाढत असल्याचे वास्तवही समोर येत असल्याचे जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. बालविवाह होऊ नयेत म्हणून महिला व बालकल्याण अधिकारी विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली बालकल्याण समितीचे सर्वच अधिकारी व कर्मचारी वॉच ठेवून असल्याचेही त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

परिस्थितीमुळे दहावीनंतर थांबविले "ती'चे शिक्षण

जालन्यात राहणारे कुटुंब कोरोनाच्या काळात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वेळापूरजवळील एका गावात स्थायिक झाले. परिस्थितीमुळे मुलीने दहावीतून शिक्षण सोडून दिले होते. शेतात मजुरी करतानाच त्यांनी मुलीचा विवाह ठरविला. विवाहासाठी जालन्यावरून त्यांचे काही नातेवाईक आले. मुलाचे वय 21 होते तर मुलीचे वय 16 होते. जिल्हा बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि मुलीला ताब्यात घेतले. दोन्ही पालकांना वेळापूर पोलिसांत हजर केल्याचे बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: जिवंत असताना घेतला स्वॅब मात्र मृत्यूनंतर आला रिपोर्ट !

...अन्‌ "ती' मुलगी निघाली कोरोना पॉझिटिव्ह

शहरातील एका नगरात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार होता. त्याची माहिती जिल्हा बालकल्याण अधिकाऱ्यांना समजली आणि त्यांनी त्या मुलीला ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यातून त्या मुलीला बालगृहात पाठविताना तिची कोरोना टेस्ट करण्यात आली नव्हती. थोडीशी लक्षणे असल्याने त्या मुलीची कोरोना टेस्ट त्या ठिकाणी करण्यात आली. त्या मुलीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बालगृहातील 21 मुलींसह सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करावी लागली. त्यामुळे आता बालगृहात येणाऱ्या प्रत्येक मुलीची कोरोना टेस्ट सर्वोपचार रुग्णालयातून करून घेतली जात आहे. दरम्यान, कारवाईवेळी संबंधित पालकांचीही कोरोना टेस्ट केली जाते तर कोरोनामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालकांचे समुपदेशन केले जात असल्याचेही सांगण्यात आले.

loading image