esakal | जिवंत असताना घेतला स्वॅब मात्र मृत्यूनंतर आला रिपोर्ट !
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Test

जिवंत असताना घेतला स्वॅब मात्र मृत्यूनंतर आला रिपोर्ट !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : दोन दिवसांपूर्वी सोलापूरच्या सर्वोपचार रुग्णालयात सावळेश्‍वर (ता. मोहोळ) येथील एक तरुण छातीत दुखू लागल्याने दाखल झाला होता. बेशुद्धावस्थेत असताना त्याचा स्वॅब दुपारी दोन वाजता घेण्यात आला. मात्र, तांत्रिक अडथळा व टेस्टसाठी झालेल्या गर्दीमुळे त्या युवकाचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता आला. तत्पूर्वी, त्या तरुणाचा मृत्यू झाला होता.

सोलापूर शहरात दोन ठिकाणी आरटीपीसीआर टेस्ट करण्याची सोय आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि अश्‍विनी सहकारी रुग्णालयात लॅब आहेत. सर्वोपचार रुग्णालयातील लॅबमध्ये त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांसह पंढरपूर, बार्शी, माळशिरस, मंगळवेढा, करमाळा, सांगोला, माढा येथील रुग्णांचे तर अश्‍विनी रुग्णालयात सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट व मोहोळ तालुक्‍यातील रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट करून दिली जात आहे.

हेही वाचा: कोरोना लसीकरणाचा बट्ट्याबोळ ! शहरातील लस संपली; ग्रामीणमध्ये 35 केंद्रांवरच लसीकरण

दररोज सरासरी साडेतीन हजार स्वॅबची चाचणी केली जात आहे. तीन शिफ्टमध्ये त्या ठिकाणी कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. तरीही टेस्टिंगची संख्या मर्यादित असल्याने आणि गर्दी वाढू लागल्याने रिपोर्टसाठी विलंब लागत आहे. पाच टप्प्यांतून रिपोर्ट तयार होत असल्याने किमान 20 ते 24 तासांचा वेळ लागत आहे. तर दुसरीकडे मृतांची सीबी-नॅट टेस्ट केली जाते. त्याचा रिपोर्ट दोन ते अडीच तासांत मिळतो, असे लॅबमधील तंत्रज्ञांनी सांगितले. सावळेश्‍वर येथील रुग्णाचा मृत्यू न झाल्याने त्याची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती आणि त्यामुळेच रिपोर्टसाठी वेळ लागल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा: शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?

कुटुंबीयांनी जड अंत:करणाने घेतला निर्णय

घरातील कर्त्या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या दु:खात कुटुंबातील सदस्य होते. अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबीयांना तरुणाच्या रिपोर्टची प्रतीक्षा होती. स्वॅब घेताना तो तरुण जिवंत असल्याने त्याची सीबी-नॅटऐवजी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. तांत्रिक अडचणीमुळे त्याचा रिपोर्ट 22 तासांनी मिळाला. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर गावात अंत्यविधी करावी की नको, यावर चर्चा झाली. गावकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी जड अंत:करणाने शहरातच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

loading image
go to top