चिमुकलीचा श्वास थांबला अन् ते ‘दोघे’ देवाच्या रूपात धावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RPF Jawan Solapur

‘डॉक्टर-डॉक्टर...’ असा आवाज पडला... दोघेही प्लॅटफॉर्म तीनकडे धावले... डी-३ जनरल कोच सीट क्रमांक ५१-५४ येथे गोंधळ सुरू झाला... दोन वर्षांची चिमुकली अचानक बेशुद्ध अवस्थेत आढळून आली...

चिमुकलीचा श्वास थांबला अन् ते ‘दोघे’ देवाच्या रूपात धावले

सोलापूर - वेळ मंगळवारी (ता. १२) सकाळी अकराची... मुंबईच्या दिशेने उद्यान एक्स्प्रेस (Udyan Express) निघालेली... प्लॅटफॉर्म एकवर गस्त घालत असलेले आरपीएफचे (RPF) सहाय्यक फौजदार सुहास जाधव आणि हवालदार बालाजी नाबदे यांच्या कानी अचानक प्लॅटफॉर्म तीनवरून ‘डॉक्टर-डॉक्टर...’ 9Doctor-Doctor) असा आवाज पडला... दोघेही प्लॅटफॉर्म तीनकडे धावले... डी-३ जनरल कोच सीट क्रमांक ५१-५४ येथे गोंधळ सुरू झाला... दोन वर्षांची चिमुकली (Child) अचानक बेशुद्ध (Unconscious) अवस्थेत आढळून आली...

याचवेळी क्षणाचाही विलंब न करता आरपीएफ कर्मचारी तिला घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या दिशेने धावत सुटले. दारासमोर रुग्णवाहिका उभी होती. जवळपास १५ ते २० मिनिटे संघर्ष सुरू होता. काही वेळ गेल्यानंतर सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये चिमुकलीस दाखल केले आणि अवघ्या काही मिनिटांत चिमुकली शुद्धीवर आली. हे चित्र पाहताच नातेवाईक आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

दरम्यान, घडलेली घटना अशी की, श्रीकांत धसाडे (वय ३५, रा. अण्णाभाऊ साठेनगर, अप्पर डेपो बॅकसाईड, पुणे) हे आपल्या कुटुंबासह उद्यान एक्स्प्रेसच्या डी-३ जनरल डब्यातून प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांची दोन वर्षांची मुलगी ओवी व्यवस्थित होती. मात्र, सोलापूर स्थानकावर उद्यान एक्स्प्रेस आली आणि अचानक ओवी बेशुद्ध पडली. तिचा श्वास हळूहळू बंद होऊ लागला. आरपीएफ जवानांनी तिला उपचारासाठी स्थानकावर असलेल्या रुग्णवाहिकेमधून अश्विनी हॉस्पिटलचे डॉ. विशाल मगर यांच्याकडे दाखविले. डॉक्टरांनी तिला उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला.

अवघ्या काही मिनिटांत रुग्णवाहिकेतून उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याची माहिती आरपीएफ नियंत्रण कक्षास कळविली. सध्या ओवीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, तिची प्रकृती व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आरपीएफ सोलापूरचे सहाय्यक फौजदार सुहास जाधव व हवालदार बालाजी नाबदे यांनी कर्तव्यावर असताना बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दोन वर्षीय चिमुकलीला अश्विनी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने त्या चिमुकलीचा जीव वाचला. या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. प्रवाशांमध्ये आरपीएफवरील विश्वासाची भावना वाढीस लागली आहे.

उद्यान एक्सप्रेसने पुण्याला निघालो होतो. मात्र सोलापूरला आल्यानंतर माझी मुलगी अचानक बेशुद्ध पडली. अवघ्या काही मिनिटांत आरपीएफ कर्मचाऱ्यांमुळे माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करता आले. खरेच ते दोघेजण माझ्यासाठी देवाच्या रूपात धावून आले.

- श्रीकांत धसाडे, मुलीचे वडील

Web Title: Child Receive Unconscious Condition On Solapur Railway Platform

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..