Children day : उसाच्या फडातील कोयत्याची धार करते ‘शिक्षणावर प्रहार’

कामगारांच्या मुलांचा बालदिन ऊसाच्या फडात
Children day
Children daysakal

सासुरे : एकीकडे सर्वत्र शाळांतील मुलांच्या हातात गुलाबाचे फूल देऊन बालदिनाचा धुमधडाक्यात साजरा होण्याचा माहोल उठेल. मात्र दुसरीकडे उसतोड कामगारांची मुले मात्र, हातात कोयता घेऊन त्यात आपलं भविष्य शोधताना दिसत आहेत, ही कोयत्याची धार जरी त्यांच्या पोटाचा आधार असली तरी त्यांच्या हातामधील कोयत्याची धार त्यांच्या शिक्षणावर प्रहार करणारी आहे.

सोलापूर जिल्हा ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. चालू हंगामासाठी जवळपास एकूण ४० कारखान्यापैकी सुमारे ३० कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. कारखान्यासाठी ऊसतोड मजूर हा महत्वाचा घटक आहे. ऊसतोड मजूर हे विशेष करून बीड, धुळे, उस्मानाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, परभणी, नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आहेत. हे ऊसतोड मजूर कारखान्याचा हंगाम सुरु

होताच ठरलेल्या टोळीत किंवा बैलगाडीने ऊस वाहतूक करण्यासाठी संपूर्ण परिवारासह कारखाना गाठतात. पती- पत्नी दोघेही ऊस तोडीस गेल्यानंतर लहान मुलांच्या देखभालीची जिम्मेदारी शाळेत शिकाणाऱ्या मोठ्या मुलांवर येऊन पडते. परिणामी त्यांना दिवाळीनंतर शिक्षणापासून वंचित राहावे लागते. सलग सहा ते सात महिने शाळेत नसल्याने कालांतराने ही मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. परिणामी निरक्षर राहतात. अनेक मुले तर लहान वयातच व्यसनाच्या आहारी गेल्याचेही आढळून येते. बालविवाह ही घडतात. अनेकदा कोवळ्या वयातच प्रपंचाचा या मुलांना भार घ्यावा लागतो

‘शिकूण कुठं नौकरी लागणार हाय’ ही विचारधारा अजून या पालकांतून बदललेली नाही. त्यामुळे शिक्षण हे फक्त पैसा कमवण्याचे किंवा नोकरी मिळवण्याचेच साधन असल्याचे त्यांचे मत आहे. शिक्षणाने माणूस शहाणा व समृध्द होतो. शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे हे विचार कळायला अजून त्यांना बहुधा खूप वेळ लागेल. पण तोपर्यंत या ऊसतोड कामगारांच्या अनेक पिढ्या निरक्षर होतील, त्याचे काय मुलांच्या या परिस्थितीस जबाबदार कोण त्यांचे अज्ञान की गरीबी ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी गुलाबाचे कधी दिसणार काहीही असले तरी या मुलांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवणे आव्हानात्मक असले तरी गरजेचे आहे.

आम्ही सगळीच मोठी माणसं ऊस फडावर जातो. मग या लहान पोरांना कुठं ठिवाव त्यांना कोण सांभळणार अन शाळा शिकून कुठं बॅरिस्टर हुणार हाय व्हय त्यापरीस प्रपंचाला हातभार तर लागतो. लिहाय -वाचाय आलं तर मोप झालं !

- लक्ष्मी मोरे, उसतोड मजूर (धुळे)

काय करायचं पोटासाठी, जगायसाठी तर काम करावच लागणार. ऊसतोडीसाठी कुठल्या गावात जायचं हे आम्हालाबी माहिती नसतं. रोज गांव बदलावं लागतं. मग पोरांना कुठल्या शाळेत ठेवणार

- संतोष मालचे, उसतोड मजूर (धुळे)

ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून शासन स्तरावरून या मुलांचे सर्व्हेक्षण व्हायला हवे. या मुलांसाठी साखर शाळा चांगली संकल्पना आहे, त्याचा विकास व्हायला हवा.

- खंडेराया घोडके, प्राचार्य, वैराग, ता. बार्शी.

ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी अनेक आश्रमशाळा आहेत. ही मुले भटक्या प्रवर्गातील असल्याने त्यांचा प्रवेश आश्रमशाळेत होऊ शकतो. मुलांना शिक्षणापासून वंचित न ठेवता जवळच्या आश्रमशाळेत प्रवेश घ्यावा .

- जयराम मोटे, मुख्याध्यापक, आश्रमशाळा जामगांव, ता. माढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com