Solapur : क्षीरसागरांच्या पावरलूम मॉडेलला चीनची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षीरसागरांच्या पावरलूम मॉडेलला चीनची मागणी

क्षीरसागरांच्या पावरलूम मॉडेलला चीनची मागणी

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : येथील शशी क्षीरसागर यांनी तयार केलेले पावरलूमचे विव्हिंग मॉडेल देशातील पहिले मॉडेल ठरले आहे. या मॉडेलला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. चीनच्या एका कंपनीने या मॉडेलची मागणी केली आहे.

शशी क्षीरसागर यांच्या कुटुंबात पावरलूम व्यवसायाचा मोठा वारसा आहे. त्यांचे आजोबा कमलाकर क्षीरसागर हे टर्किश टॉवेलचे जनक मानले जातात. त्यांचे नातू शशी सुधीर क्षीरसागर यांनी मागील काही वर्षापासून पावरलूमचे मॉडेल तयार करावे, असा चंग बांधला होता. आतापर्यंत पावरलूमचा आकार कमी करण्याबाबत कोणतेही संशोधन केलेले नव्हते. त्यामुळे पावरलूमचा मोठा आकार पाहता तेवढीच मोठी जागा म्हणजे मिल हे समीकरण कायम या व्यवसायात राहिले आहे. शशी क्षीरसागर यांनी मात्र कोणत्याही स्थितीत विव्हिंग लूमचे मॉडेल तयार करायचेच असे ठरवले.

खरेतर अशा प्रकारचे मॉडेल कधी अस्तित्वातच नव्हते. इस्तंबूलमध्ये एका व्यक्तीने असा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. शशी क्षीरसागर यांनी या मॉडेलवर काम सुरु केले. अत्यंत क्‍लिष्ट अशा प्रकारचे हे काम होते. तसेच हे केवळ मॉडेल पाहण्यापुरते नसावे तर ते वर्किंग मॉडेल असावे, ही त्यांची जिद्द होती. या मॉडेलवर प्रत्यक्षात कापड तयार व्हावे, असा त्यांचा प्रयत्न होता.

दोन वर्षापासून त्यांनी या मॉडेलवर काम सुरु केले. अनेक प्रकारचे साहित्य वापरून त्यांनी मॉडेलची रचना केली. त्यासोबत त्याला विद्युत उर्जा एका मोटरद्वारे दिली. या मॉडेलमध्ये त्यांनी ‘वन अप वन डाउन’ हे तंत्र वापरले. काही वर्षापूर्वी त्यांच्या आजोबांनी ‘वन अप टू डाऊन’ हे तंत्र वापरून टर्कीश टॉवेलची निर्मिती केलेली होती. ‘वन अप वन डाउन’ या तंत्राने साधारण ९ इंच रुंदीचे कापड तयार करता येते.

तसेच या मॉडेलचे सुटे भाग देखील तयार करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. मॉडेल तयार झाल्यानंतर सुट्या भागाचा पुरवठा झाला तर मॉडेलची यशस्विता व कार्यक्षमता स्थापित करणे आवश्‍यक होते. तेव्हा त्यांनी सुट्या भागाची निर्मिती केली. त्यांनी त्यांचे हे मॉडेल यूट्यूबवर अपलोड केले. तेव्हा हजारो अभ्यासक, संशोधक व पावरलूम व्यावसायिकांनी त्यांना प्रतिसाद दिला. आता चीनच्या एका कंपनीने त्यांचे हे मॉडेल मागवले आहे. तसेच कापडाच्या मास प्रोडक्‍शनसाठी हे मॉडेल वापरण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

loading image
go to top