esakal | डिकसळच्या इंगोले-पवार वस्तीची बिकट वाट ! रस्ता नसल्याने नागरिकांचे होताहेत हाल 
sakal

बोलून बातमी शोधा

Sangola Road

डिकसळ (ता. सांगोला) येथील गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील इंगोले-पवार व भुसनर वस्तीवर जाण्या-येण्यासाठी व्यवस्थित रस्ताच नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एखादी व्यक्ती आजारी पडली तर तीन किलोमीटर पायपीट करून गाव गाठावे लागत आहे. 

डिकसळच्या इंगोले-पवार वस्तीची बिकट वाट ! रस्ता नसल्याने नागरिकांचे होताहेत हाल 

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : डिकसळ (ता. सांगोला) येथील गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील इंगोले-पवार व भुसनर वस्तीवर जाण्या-येण्यासाठी व्यवस्थित रस्ताच नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एखादी व्यक्ती आजारी पडली तर तीन किलोमीटर पायपीट करून गाव गाठावे लागत आहे. 

याचाच अनुभव या वस्तीवरील वैभव विठोबा भुसनर या 27 वर्षीय युवकाला आलेला आहे. वस्तीवरील या युवकाला झोळी करून, खांद्यावर घेऊन दवाखान्यात दाखल करण्यात आले. डिकसळ-आवंढी हा इंगोले-पवार वस्तीवरून जाणारा पूर्वापार रस्ता; पण सध्या मध्येच बऱ्याच शेतकऱ्यांनी हा रस्ता बंद केल्याने, या वस्तीवरील लोकांना जाण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नाही. याच मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

सध्याच्या पावसाने तर या रस्त्याची वाट बिकट झाली आहे. येथील युवक मात्र पोहत कमरेपेक्षाही जास्त पाण्यातून दूध घालण्यासाठी येतात. दोन दिवसांपूर्वी वैभव इंगोले यांची बहीण प्रसूत झाल्यानंतर बाळ व बाळंतिणीची प्रकृती बिघडली. या प्रसूत महिलेलाही नाइकाच्या तलावापर्यंत दोन किलोमीटर अंतर चालत यावे लागले. वैभव भुसनर या आजारी युवकाला घरातून दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी वयोवृद्ध आई-वडिलांशिवाय कोणीच नव्हते. या युवकाला ताप येत होता व पोटही मोठ्या प्रमाणात दुखत होते. त्या दरम्यान या वस्तीतील वैभव इंगोले, शरदचंद्र पवार, नवनाथ इंगोले, साहेबराव इंगोले व धनाजी इंगोले या युवकांनी झोळीच्या साहाय्याने खांद्यावर घेत गावापर्यंत आणले. त्यानंतर दुचाकीवरून वायफळ येथे दवाखान्यात नेले. 

विशेष म्हणजे पन्नासच्या पुढे लोकवस्ती असलेल्या या वस्तीवरील प्रत्येक व्यक्तीच्या आधार कार्डवर आवंढी रोड, इंगोले-पवार वस्ती, डिकसळ असा पत्ताही आहे. येथील ग्रामस्थांनी तहसीलला चार वेळा अर्ज दिले, पण महसूल विभागही याकडे लक्ष देत नाही. दोन दिवसांपूर्वीच या रस्त्यावरून एका 27 वर्षीय युवक ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेला होता. झाडाच्या आधारामुळे तो वाचला. सध्या या वस्तीतील लोकांची अवस्था रस्त्याविना वाईट झाली आहे. या वस्तीला रस्ताच नसल्याने पाहुणे मंडळी इकडे मुलीही देत नाहीत, असे नागरिक सांगतात. ग्रामपंचायतीने रस्त्यासाठी निधी मंजूर केला; पण लगतचे शेतकरी रस्ता होऊ देत नाहीत. सध्या या वस्तीवरील लोकांची वाट बिकट आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top