esakal | पोलिस पती-पत्नीच्या पुढाकारातून युवकांचा स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीचा सराव 
sakal

बोलून बातमी शोधा

Police Couple

तालुक्‍यापासून 25 किलोमीटर अंतरावरील दुष्काळी रड्डे गावात अनेक सुविधांचा अभाव आहे. गावातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. स्पर्धा परीक्षा व पोलिस, सैन्य दलात भरती होण्यासाठी पुणे, मुंबई व अन्य ऍकॅडमीत पैसे भरून जावे लागले. पण गरीब तरुणांसमोर पैशाचा मोठा प्रश्न आहेच. त्यातून प्रयत्न करणारे अनेक तरुण कोरोना संकटात गावी आले. त्या तरुणांचा अभ्यास व शारीरिक चाचणीत खंड पडू लागला. 

पोलिस पती-पत्नीच्या पुढाकारातून युवकांचा स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीचा सराव 

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा, पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांसाठी अभ्यासिका व शारीरिक चाचणीचे साहित्य आवश्‍यक असते. साहित्याची ही उणीव भरून काढण्यासाठी पोलिस दलातील पती-पत्नीने पुढाकार घेऊन मंगळवेढा तालुक्‍यातील रड्डे गावात आवश्‍यक साहित्य उपलब्ध केले. त्यांचा हा उपक्रम बेरोजगार व प्रयत्नवादी युवकांसाठी आदर्शवत ठरला. 

हेही वाचा : मनालीच्या ऑनलाइन इको-फ्रेंडली बाप्पाच्या कार्यशाळेस राज्यातून प्रतिसाद; 700 जणांनी बनवल्या मूर्ती 

तालुक्‍यापासून 25 किलोमीटर अंतरावरील दुष्काळी रड्डे गावात अनेक सुविधांचा अभाव आहे. बहुतांश कुटुंबांचा ऊस तोडणी व्यवसायाशी अधिक संबंध येतो. गावात सुविधांचा अभाव असल्याने काही तरुणांना गाव सोडून जावे लागले. अनेक तरुणांनी जिद्दीच्या जोरावर यश संपादन केले. त्यामध्ये जिल्हाधिकारी झालेल्या तृप्ती दोडमिसे-नवत्रे, डीवायएसपी. सचिन थोरबोले, एपीआय बालाजी कांबळे, एपीआय सूर्यकांत सपताळे यांच्या निवडीने गाव अधिक चर्चेत आले. त्यानंतर अनेक तरुणांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. स्पर्धा परीक्षा व पोलिस, सैन्य दलात भरती होण्यासाठी पुणे, मुंबई व अन्य ऍकॅडमीत पैसे भरून जावे लागले. पण गरीब तरुणांसमोर पैशाचा मोठा प्रश्न आहेच. त्यातून प्रयत्न करणारे अनेक तरुण कोरोना संकटात गावी आले. त्या तरुणांचा अभ्यास व शारीरिक चाचणीत खंड पडू लागला.

हेही वाचा : धक्कादायक वास्तव! "येथील' मुलांना तीन महिन्यांनंतरही मिळेना शिक्षण 

पण संभाव्य पोलिस भरती अभ्यास व शारीरिक चाचणीसाठी आवश्‍यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील श्वान पथकातील पोलिस नाईक लक्ष्मण कोळेकर व सुरक्षा शाखेतील त्यांच्या पत्नी पोलिस नाईक विद्या मळगे-कोळेकर यांनी केला. त्यासाठी रड्डे गावात स्पर्धा परीक्षा आणि पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी सर्व गावकऱ्यांनी मदत देत एकाच वेळी 32 विद्यार्थी अभ्यास करू शकतील अशा सार्वजनिक अभ्यासिकेची व्यवस्था केली. त्यात नामवंत लेखकांची पुस्तके उपलब्ध केली. धावण्यासाठी मैदान, पुलअप्सचे खांब, गोळाफेक मैदान व 100 मीटरचे मैदान तयार केले आहे. त्याचा लाभ गावात व परिसरातील तरुणांना होत आहे. 

बेरोजगारांसाठी केलेल्या या उपक्रमाबरोबर लोकांच्या सहभागातून गावात श्रमदान व स्वच्छता करून ठिकठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. त्यांना गावातील विकास सांगोलकर, सिद्धनाथ कांबळे, रामा सपताळे, दिगंबर नवत्रे, अनिल थोरबोले, राजू गवळी, अजय सपताळे यांनी सहकार्य केले. 

याबाबत पोलिस नाईक लक्ष्मण कोळेकर म्हणाले, शिक्षण घेत मी प्लॉन्ट ऑपरेटर म्हणून काम करत भरतीची तयारी 2005 पासून केली. त्यात 2007 ला यश आले. पण ग्रामीण भागात परिस्थितीशी सामना करणाऱ्या प्रयत्नशील युवकांसाठी पुढाकार घेतला. 

दुष्काळी रड्डे गावात या पोलिस पती-पत्नीने केलेल्या उपक्रमाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top