esakal | 'हीच' ताकद पोटनिवडणुकीत लावली असती तर राष्ट्रवादीचा विजय निश्‍चित होता! | Political News
sakal

बोलून बातमी शोधा

NCP
'हीच' ताकद पोटनिवडणुकीत लावली असती तर राष्ट्रवादीचा विजय निश्‍चित होता!

'हीच' ताकद पोटनिवडणुकीत लावली असती तर NCP चा विजय निश्‍चित होता!

sakal_logo
By
हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) पदाधिकारी निवडीवरून मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्‍यात झालेल्या धुसफुशीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली. आता नव्या कार्यकारिणीची निवड जलसंपदामंत्री व पालकमंत्री या दोन्ही गटातील प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणी अध्यक्ष यांच्या संयुक्त बैठकीद्वारे करण्याचे ठरले. त्यामुळे या वादावर पडदा पडला असला तरी अंतर्गत धुसफूस सुरूच आहे.

"महाराष्ट्र बंद'चे निवेदन एका गटाने उपविभागीय अधिकाऱ्याला तर दुसऱ्या गटाने तहसीलदार यांना दिले. पदाधिकारी बदलणे व बदललेल्या पदाधिकाऱ्यांबाबत आक्षेप घेणे, आक्षेप घेतल्यानंतर जुनी कार्यकारिणी देखील बरखास्त करणे अशी शक्‍ती दोन्ही गटांनी खर्ची घातली. एवढीच ताकद तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पोटनिवडणुकीत लावली असती तर कदाचित ही जागा राष्ट्रवादीला ताब्यात ठेवण्यात यश आले असते.

हेही वाचा: कोण आहे पवारांच्या डोक्‍यातील विधानपरिषद निवडणुकीसाठीचा उमेदवार?

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मंगळवेढा तालुक्‍यात राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. "पवार बोले, मंगळवेढा हाले' अशी येथील परिस्थिती होती. परंतु 2009 ते 2019 या कालावधीत राष्ट्रवादीला लागलेली उतरती कळा 2019 मध्ये भारत भालके यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भक्कम झाली होती. परंतु, भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला जागा ताब्यात ठेवण्यात अपयश आल्यामुळे सध्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चुळबूळ सुरू झाली आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आला. परंतु, काहींना जिल्हा कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. यावरून राष्ट्रवादीच्या एका गटाने आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा ठपका ठेवत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार केली. नवी कार्यकारिणी योग्य असल्याचेही पवार यांची भेट घेऊन सांगण्यात आले. परंतु, तक्रारीची गंभीर दखल घेत पवारांनी जिल्हाध्यक्षांना विश्वासात घेऊन पदाधिकारी निवडी करा, अशा सूचना दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या एका गटाला जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी नवीन कार्यकारिणी स्थगित करण्यात आल्याचे पत्र दिले तर दुसऱ्या गटाला नवी व जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे पत्र दिले.

हेही वाचा: प्रणितीताई, पालकमंत्र्यांसारखे धावते दौरे बरं नव्हं !

राष्ट्रवादीतील नाराज गळाला लागणार का?

अशा परिस्थितीमध्ये नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचालींवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस व भाजपच्या नेत्यांचे लक्ष आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता, सध्या कॉंग्रेसने आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना जवळ घेत पक्षाची मोट बांधण्याचे प्रयत्न जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सुरू केले आहेत. तर भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी कोणावरही राजकीय सूड न उगवता शांतपणे वाटचाल सुरू ठेवली. त्यामुळे आगामी निवडणुकीत कॉंग्रेस गट मजबूत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीतील कोण हाताला लागते का, याची चाचपणी केली जात आहे, तर त्याचप्रमाणे भाजपच्या नेत्यांकडून देखील राष्ट्रवादीच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. आगामी काळात राष्ट्रवादीतील नाराज या दोन्ही पक्षांच्या गळाला लागणार का, हेही पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

loading image
go to top