esakal | Solapur : प्रणितीताई, पालकमंत्री होण्यापूर्वीच पालकमंत्र्यांसारखे धावते दौरे बरं नव्हं!
sakal

बोलून बातमी शोधा

प्रणितीताई, पालकमंत्र्यांसारखे धावते दौरे बरं नव्हं !

अनेकजण पक्षांतर करत असतानाही आमदार प्रणिती शिंदे या आठवड्यातील काही दिवसच सोलापूरला येत आहेत.

प्रणितीताई, पालकमंत्र्यांसारखे धावते दौरे बरं नव्हं !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर-ग्रामीणमधील कॉंग्रेस (Congress) पक्षाचे विस्कटलेले संघटन मजबूत करण्यासाठी मोठ्या नेत्यांनी तालुकानिहाय दौरे घेऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्याची धुरा आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यावर आहे. अनेकजण पक्षांतर करत असतानाही आमदार प्रणिती शिंदे या आठवड्यातील काही दिवसच सोलापूरला येत आहेत. त्यांच्या लिमिटेड कार्यक्रमांमुळे व अपुऱ्या वेळेमुळे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी पालकमंत्री होण्यापूर्वीच पालकमंत्र्यांप्रमाणे दौरे बंद करून महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी पूर्णवेळ लक्ष द्यावा, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्‍त करीत आहेत.

हेही वाचा: बार्शीत दरोडा! नवीन ट्रॅक्‍टर-ट्रॉलीसह 15 लाखांचा ऐवज लंपास

2019 च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना पराभूत करून आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून हॅट्ट्रिक साधली. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल, असा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्‍वास होता. त्यानंतर मागील अधिवेशनात त्यांना विधानसभेच्या अध्यक्षपदावर काहीवेळ बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांना वाटू लागले की, ताईंना आता ते पद तरी मिळेल. मात्र, तसे काहीच झाले नाही. महामंडळे असो वा काही मंदिर समित्यांवरील अध्यक्षपदांच्या निवडी झालेल्या नाहीत. पक्षातील वजनदार व ताकदवान नेत्यांनाच तशा ठिकाणी संधी मिळते हे वास्तव आहे. मात्र, संपूर्ण सोलापूर शहर- ग्रामीणमध्ये कॉंग्रेसचा एकमेव आमदार असूनही सोलापूर महापालिका, जिल्हा परिषदेतही कॉंग्रेसची सत्ता नाही. त्यामुळे राज्याचा कारभार सांभाळताना स्थानिक गड राखणे खूप महत्त्वाचे असते. कॉंग्रेसच्या बाबतीत तसे दिसत नाही. 2019 च्या निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांनी तिसऱ्यांदा बाजी मारली. परंतु, त्यांच्या मताधिक्‍यात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपला टक्‍कर देण्यासाठी कोणत्याही पक्षाला 102 तगडे उमेदवार भेटतील, अशी स्थिती नाही. त्यामुळे तिन्ही पक्ष मिळून लढल्यास मतविभाजन होणार नाही, एकमेकांमध्ये पाडापाडी होणार नाही, याचा अंदाज घेऊन कॉंग्रेसने आता राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

पदाधिकाऱ्यांच्या पक्षांतरानंतरही कॉंग्रेसची भूमिका गप्पच

महापालिकेच्या 102 नगरसेवकांपैकी 52 नगरसेवक ज्यांचे त्यांचीच सत्ता, हे सूत्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तौफिक शेख, महेश कोठे यांच्यासह अन्य पदाधिकारी दाखल झाल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. स्वबळावर लढल्यास महाविकास आघाडीतील उमेदवार एकमेकांना पाडण्याचेच काम करतील, असा राजकीय अंदाज आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढल्यास 52 जागा मिळविणे कठीण असल्याचा अंदाज आल्याने अनेकजण कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत. माजी महापौर व माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादीत गेल्यानंतरही कॉंग्रेसने मित्रपक्षाला काहीच न बोलता गेलेले पदाधिकारी आमचे नव्हतेच, अशी भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी हाच खरा शत्रू असून त्यांच्या पक्षातील नाराजांना आपल्याकडे घ्यावे, अशी मागणी केली. परंतु, त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही.

हेही वाचा: 'इस्मा'च्या संचालकपदी महेश देशमुख! राज्यातून तिघांना संधी

आमदार प्रणिती शिंदेंवर कॉंग्रेसची मदार

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ऍड. शरद बनसोडे यांनी तर 2019 मध्ये डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी पराभव केल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे राजकारणापासून काही प्रमाणात दूर गेले आहेत. यापुढे निवडणूक लढविणार नसल्याचेही त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षाची संपूर्ण धुरा आमदार प्रणिती शिंदे यांच्यावरच आहे. तरीही, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनी चंदेले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर काही नगरसेवकांनी यापूर्वीच पक्षाचे काम करणे सोडून दिले आहे. अन्य काही नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे राज्यमंत्री असून त्यांच्याकडे पालकमंत्रिपदाची धुरा आहे. ते मूळचे इंदापूरचे असल्याने त्यांना त्यांच्या मतदारसंघाकडेही लक्ष द्यावे लागते. त्यामुळे ते धावता दौरा करून लगेचच इंदापूर अथवा मुंबईला रवाना होतात. तसा प्रकार आमदार प्रणिती शिंदे यांनी सुरू केल्याचीही चर्चा आहे.

loading image
go to top