'आयपीएल' सट्ट्याचे जिल्ह्याबाहेरही कनेक्‍शन ! सट्टा घेणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात 

1online_20satta.jpg
1online_20satta.jpg

सोलापूर : शिवगंगा नगर भाग-2 मजरेवाडी परीसरात मोहम्मद जावेद नसरुद्दीन लुंजे (वय 42) हा त्याच्या घरासमोरील बोळात आयपीएल क्रिकेट मॅचवर पैज लावत होता. लावलेले पैसे विचारून तो जुगार चालवत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानंतर लुंजे या बिडरला (सट्टा घेणारा) गुन्हे शाखेने नियोजनबध्द सापळा रचून पकडले. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदिप शिंदे यांनी ही कारवाई केली.

शहरातील मजरेवाडी परिसरातील शिवगंगा नगर भाग- दोनमध्ये मोहम्मद हा जुगार घेत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यावेळी तो मोबाईलमध्ये आकडेमोड करत होता. साध्या वेशातील पोलीस दिसताच मोहम्मद हा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला जागीच पकडले. त्याच्याकडे विचारणा केली असता, तो मोबाईलमधील व्हाट्‌सअप अकाउंटद्वारे आयपीएल मॅच कोण जिंकेल म्हणून लोकांकडून पैसे स्वीकारून जुगार चालवीत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलीस नाईक सागर गुंड यांनी त्याला पकडले. त्यावेळी त्याला समजावून सांगत असतानाच तो गुंड यांच्या अंगावर धावून आला. तर शिवीगाळ करुन त्याने सरकारी कामात अडथळा आणला, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मोहम्मद याला बुधवारी (ता. 4) न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 


मोबाईलवरुन आता पुढील तपास 
आयपीएल क्रिकेट मॅच कोण जिंकेल म्हणून सट्टा घेणाऱ्या बिडरला गुन्हे शाखेने आज पकडले. 42 वर्षीय मोहम्मद शिवगंगा नगर भाग- दोन परिसरात राहायला आहे. मागील काही दिवसांपासून पोलिसांनी त्याच्यावर वॉच ठेवला होता. तो आज (बुधवारी) पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्याकडील मोबाइल व 20 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आता त्याच्या मोबाईलवर या सट्ट्याचे कनेक्‍शन पडताळले जाणार आहे. प्रथमदर्शनी तो जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरुन सट्टा घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तांत्रिक बाबींची पडताळणी केल्यानंतर वस्तुस्थिती बाहेर येईल, असेही एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 


अकरा वर्षानंतर तीन सराईत गुन्हेगारांवर मोक्का 
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजय उर्फ लखन गोकुळ परदेशी व त्याचे साथीदार सोमनाथ उर्फ सोमा सदाशिव गायकवाड आणि सोनू उर्फ ध्रुव सदाशिव मोरे या तिघांविरुद्ध पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मागील अकरा वर्षात 29 प्रकारचे मालाविषयक व शरीरविषयक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये शहर व परिसरात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे, पोलिसांवर हल्ला करणे, बेकायदेशीर घरात घुसणे, अस्तित्व लपवणे, जनतेच्या संपत्तीची मोडतोड करून नुकसान करणे, परिसरात दहशत माजवणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त बापू बांगर डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे व विजापूर नाका पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे व सध्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com